आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0
45
प्रातिनिधिक छायाचित्र.

लातूर:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर उन्हाळी २०२० च्या परीक्षा  पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा घेण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्यीच माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षांबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीलीप म्हैसेकर यांनी प्रा. डॉ. मोहन खामगावकर, प्रतिकुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा झाली. सर्व वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता तसेच केंद्रीय परिषदेचे सदस्य डॉ.  दर्शन दक्षिणदास, डॉ. कैलाश शर्मा व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एस.एस. सावरीकर हे यात  सहभागी झाले होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर २०२० च्या परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या, या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या प्रमुख संस्था, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी विचारविनिमय करून त्यानंतर घेण्यात याव्या तसेच परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच विद्यापीठाच्या कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहिती ग्राह्य धरण्यात यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा