विमानाची परवानगी नाकारल्यामुळे मराठवाड्यातील कोरोना बाधित ज्येष्ठ मंत्री ऍम्बुलन्सने मुंबईला!

0
3386

मुंबईः महाविकास आघाडी सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नांदेडहून विमानाने मुंबईला हलवण्याचे सरकारचे प्रयत्न प्रशासनातीलच अधिकाऱ्यांमुळे अपयशी ठरले असून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला विमानाने आणता येत नसल्याची सबब पुढे करून परवानगी नाकारल्यामुळे हे मंत्री नांदेड ते मुंबई असा ५७३ किलोमीटरचा प्रवास करत अॅम्बुलन्सने मुंबईला निघाले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये महत्वाचे खाते असलेल्या मराठवाड्यातील या मंत्र्यांचा तपासणी अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने कालच पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कळवला. मुख्यमंत्र्यांनीही या ज्येष्ठ मंत्र्यांना नांदेडहून एअरलिफ्ट करून मुंबईला आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले मात्र प्रशासनातीलच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला विमानाने आणता येत नसल्याची सबब पुढे करून परवानगी नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत पोहोचायला होणार मध्यरात्रः प्रशासनाच्या लालफितशाहीच्या फटक्यामुळे विमानाची परवानगीच मिळाली नसल्यामुळे अखेर हे ज्येष्ठ मंत्री अॅम्बुलन्सने नांदेडहून मुंबईला निघाले आहेत. नांदेड ते मुंबई हे अंतर ५७३ किलोमीटर आहे. रस्ते मार्गे नांदेडहून मुंबईला पोहोचण्यासाठी साधारणतः ११ ते साडेआकरा तास लागतात. म्हणजेच नांदेडहून सकाळी निघालेल्या या मंत्र्यांना मुंबईत पोहोचायला आज मध्यरात्र होणार आहे. त्यानंतर तब्बल ११ ते साडेआकरा तासांनंतर मुंबईत उपचार मिळणार आहेत.

ते झारीतील शुक्राचार्य कोण?: या ज्येष्ठ मंत्र्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच शास्त्रीय भाषेत त्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग असिम्प्टोमॅटिक आहे. मुंबईत असताना त्यांनी दोन वेळा कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र नांदेडमध्ये केलेल्या चाचणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासनात असलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी त्यांना एअरलिफ्ट करण्याची परवानगी नाकारल्यामुळे कॉर्डिअॅक अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना व्हावे लागले, असे सूत्रांनी सांगितले. ते झारीतील शुक्राचार्य कोण? अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा