कोरोनाशी लढाः देशात लॉकडाऊन वाढणार की संपणार?- शनिवारी होणार अंतिम फैसला!

0
101
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील परिस्थिती सामाजिक आणीबाणीसारखीच असून या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवा, अशी सूचना राज्ये, जिल्हा प्रशासन आणि तज्ज्ञांनी केली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. येत्या शनिवारी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून त्यानंतरच लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोदी यांनी बुधवारी देशातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.  या ऑनलाइन बैठकीत त्यांनी देशभरातील कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती आणि लॉकडाऊनचा कालावधी याबाबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे संकेत दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याची मुदत येत्या १४ एप्रिलला संपणार आहे.नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा लॉकडाऊनचा मुख्य उद्देश आहे.

८० टक्के राजकीय पक्षांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करूनच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शनिवारी, ११ एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा