सोनिया गांधींविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी, अर्णब गोस्वामीविरुद्ध देशभरात एफआयआर

1
509
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/ मुंबई :  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल रिपब्लिकन टीव्ही चॅनलचे संस्थापक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामीविरुद्ध देशभरात काही ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही नागपूरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भादंविच्या १५३, १५३- अ, १५३-ब, २९५- अ, २९८, ५००, ५०४, ५०५ (२), ५०६,  १२०-ब, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांनी कट रचून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनांमध्ये तेढ, द्वेषाची भावना वाढावी तसेच धार्मिक अकोपा टिकण्यास बाधक असे युक्तिवाद केले. सार्वजनिक शांतता धोक्यात बिघडवण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केले. गोस्वामी यांच्या कृत्यामुळे धार्मिक द्वेषभावना वाढवून देशात जातीय हिंसाचार घडण्याचे वातावरण निर्माण होऊ शकते, असे राऊत यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

 राजस्थानच्या भीलवाडा पोलिस ठाण्यातही अर्णबविरुद्ध भादंविच्या कलम २९५- अ, ५०४, ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अर्णब गोस्वामी यांनी दंगल भडकवण्याच्या हेतूने हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

छत्तीसगड काँग्रेसनेही अर्णबविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव आणि प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी रायपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अर्णब यांचे वक्तव धर्माच्या आधारावर फाळणी करणारे असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, समाजात धार्मिक तेढ वाढवणे व बांद्रा/ पालघरसारख्या प्रसंगांचे खोटे वृत्तांकन केल्याबद्दल अर्णब गोस्वामीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, असे निवेदन सर्व जिल्ह्यातील पोलिसांना देण्यात आले असून आपण स्वतः संगमनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

कोण काय म्हणाले?-

आशुतोष, ज्येष्ठ पत्रकारः अर्णब गोस्वामी पत्रकारिता करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत पत्रकारितेचे नियम का लावले जावेत?

तारीक अन्वर, काँग्रेस नेतेः अर्णब गोस्वामीसारख्या गलिच्छ पत्रकाराच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. तो मानसिक दिवाळखोरीने आधीच ग्रस्त आहे आणि पत्रकार कमी व दलालच जास्त वाटतो. कुत्रे भुकल्यामुळे वाटसरू आपला मार्ग थोडाच बदलतात?

राजीव सातव, काँग्रेस नेतेः अर्णब गोस्वामीसारख्या प्रवृत्तींना विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली जर मोकाट सोडलं तर समाजातील सृष्ट आणि दृष्ट प्रवृतींचा समतोलच ढासळेल आणि अर्णब सारख्या प्रवृत्ती अधिक मान उंचावतील आणि सुसंस्कृतपणा निष्प्रभ होईल. ह्यांना वेळीच आवरा.

 भाजप अर्णब गोस्वामींच्या पाठिशीः दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्यावर आज हल्ल्याचा प्रयत्न झाला. गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मात्र भाजपने निषेध करत त्यांची पाठराखण केली आहे. आम्ही अर्णब गोस्वामीवरील हल्ल्याचा निषेध करतो. कोणत्याही पत्रकारावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हे लोकशाहीविरुद्ध आहे.सहिष्णुतेचा उपदेश करणारेच इतके असहिष्णू झाले आहेत, ही खरोखरच विडंबना आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजपनेही गोस्वामीवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवरील हल्ला अत्यंत चुकीचा आणि निषेधार्ह आहे. हल्लेखोर आणि त्यांचे सूत्रधार यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची आम्ही मागणी करतो. राज्य सरकारचे अपयश उघड करणाऱ्या माध्यमातील आणि समाज माध्यमातील अनेक लोकांना या हल्ल्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश भाजपने म्हटले आहे.

काय म्हणाले अर्णब गोस्वामी?-  देशात संताची हत्या झाली आहे. भारतात ८० टक्के हिंदू लोकसंख्या आहे. भारतात हिंदू असणे, भगवे कपडे घालणे पाप झाले आहे. मी विचारतो, जर कोणी मौलवी आणि पादरीला मारले असते तर लोक शांत बसले असते का? इटलीवाली सोनिया गांधी गप्प बसली असती का?  काँग्रेस पक्ष आणि रोमहून आलेली सोनिया गांधी गप्प बसली नसती. आज ती गप्प आहेत, मनातल्या मनात खुश आहेत. कारण संतांना रस्त्यावर मारण्यात आले, जेथे तिचेच सरकार आहे. ते याचा इटलीला रिपोर्ट पाठवतील की, जेथे मी एक सरकार स्थापन केले, तेथे मी हिंदू संतांना मारायला लावत आहे. तेथून तिला वाहवाह मिळेल. वाह बेट वाह! खूप चांगले केले सोनिया गांधी अँन्टोनिया मायनो. या लोकांना लाज वाटली पाहिजे. हिंदू गप्प राहतील असे या लोकांना वाटते का?  अशी प्रक्षोभक भाषा अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात वापरली आहे.

एक प्रतिक्रिया

  1. अशा पत्रकारांवर ताबडतोब कारवाई झाली पाहीजे,
    असा करंटेपणा ते सतत करत असतात.अशा चँनलवर बंदी आणायला हवी……अशा पाळीव कुत्र्याच्या मी जाहीर निषेध करतो….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा