कोरोनावरील ‘कोरोनिल’ बाधलेः योगगुरू रामदेव बाबांसह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

0
353
संग्रहित छायाचित्र.

जयपूरः सात दिवसांत कोरोना बरा करणारे कोरोनिल हे औषध बाजारात आणल्याचा दावा करून त्याची जाहिरातबाजी करणारे रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांच्यासह चार जणांविरुद्ध राजस्थानच्या जयपूरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध मंगळवारी बाजारात आणले होते. हे औषध घेतल्यावर सात दिवसांत कोरोनाचा संसर्ग झालेला रूग्ण बरा होतो, असा दावा करण्यात आला होता. तशी जाहिरातबाजीही पतंजलीने केली होती. यामुळे आरोपींनी लोकांची दिशाभूल केल्याचे प्राथमिक आरोपपत्रात म्हटले आहे. जयपूरच्या ज्योतिनगर पोलिस ठाण्यात रामदेव, बाळकृष्ण, वैज्ञानिक अनुराग वार्षणेय, राष्ट्रीय वैद्यकीय संस्थेचे चेअरमन बलबीर सिंह तोम आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रामदेव बाबा यांनी मंगळवारी गाजावाजा करून हे औषध बाजारात आणल्यानंतर काही तासांतच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आयुष मंत्रालयाने या औषधाची जाहिरातबाजी आणि प्रसिद्धी करण्यावर बंदी घातली होती. त्यापाठोपाठ राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारने या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली होती.

 रामदेव बाबांनी केला होता रामबाण औषध असल्याचा दावाः कोरोना किटमध्ये कोरोनिल, श्वसरी आणि अणु तेल या तीन औषधांचा समावेश आहे. ही औषधे प्रतिकारशक्ती वाढवणारी नाहीत तर कोरोना पूर्णपणे बरा करणारी आहेत. २८० कोरोना बाधित रूग्णांवर या औषधांचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यापैकी ६९ टक्के रूग्ण तीन दिवसांत बरे झाले. हे औषध घेतल्यावर सात दिवसांत रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होतो, असा दावा रामदेव बाबांनी केला होता. विशेष म्हणजे रामदेव बाबा यांच्या पतंजलीने सर्दी- खोकल्याच्या औषधासाठी लायसेन्स घेतले होते आणि त्याच लायसेन्सच्या आधारे कोरोनावरील कोणत्याही शास्त्रीय चाचण्या न करताच कोरोनिल हे औषध बाजारत आणले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा