मुंबईच्या धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली, पहिल्या पॉझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू

0
137
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीपैकी एक असलेल्या मुंबईच्या धारावीत एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याला सायन रूग्णालयात भरती करण्यात आले असून तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील सर्व सात जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची सर्वाची गुरूवारी तपासणी केली जाईल. ही व्यक्ती रहात असलेली इमारत सील करण्यात आली आहे. धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळणे ही धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णाचे वय ५६ वर्षे आहे. त्याच्यावर सायन रूग्णालयात उपचार सूरू होते. मृताला कोणताही परदेश दौऱ्याचा इतिहास नव्हता. त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मृत व्यक्ती धारावीच्या एसआरए इमारतीत रहात होता. ही इमारत आता रिकामी करण्यात आली आहे.

सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होणे ही आरोग्य यंत्रणेला चिंतेत टाकणारी बाब आहे. ६१३ हेक्टरवर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीत बहुतांश लोक रोजंदारी कामगार आणि छोटे व्यावसायिक आहेत. आता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणेही आरोग्य यंत्रणेसमोर डोकेदुखी ठरणार आहे. दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळे धारावीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे जवळपास अशक्यच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा