मराठवाड्यात पहिला बळी, औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

0
1119
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली असतानाच आज कोरोनाने मराठवाड्यात पहिला बळी घेतला. औरंगाबादेतील सातारा- देवळाई परिसरातील ७९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय म्हणजेच घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.औरंगाबादेतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ आहे.

 घाटी रुग्णालयात  शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता हा रूग्ण भरती झाला होता. त्याच्या घशातील द्रावाचा ( स्वॅब) तपासणी अहवाल आज सकाळी ८ वाजताच पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला गेल्या दहा वर्षांपासून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ह्रदयविकार असे गंभीर आजार होते. घाटीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर कोरोना संशयित म्हणून शुक्रवारपासूनच उपचार सुरू करण्यात आले होते. परंतु त्याचा आज रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मृत्यू झाला. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याला श्वसन घेण्यास तीव्र त्रास होत होता. या कारणासह पूर्वीच्या अन्य आजारांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी म्हटले आहे. हा रूग्ण सातारा- देवळाई परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाड्यातील संख्येतही वाढः दरम्यान, मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू लागली असून रविवारपर्यंत मराठवाड्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० झाली आहे. त्यात औरंगाबादेत ८, हिंगोलीत १, लातूरमध्ये ८ आणि उस्मानाबादेतील ३ रुग्णांचा समावेश आहे. मराठवाड्यातील १०६४ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ८६८ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १९६ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. २७ तपासणी अहवाल मानकाप्रमाणे नसल्यामुळे ते पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा