नांदेडच्या एसआरटी विद्यापीठाने उभारली पहिली कोरोना नमुने तपासणी प्रयोगशाळा

0
77
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इन्क्युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा तयार झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) आवश्यक त्या मान्यता प्राप्त होणार आहेत. त्यानंतर येथे कोरोना संशयितांच्या घशातील द्रावाचे ( स्वॅब) नमुने तपासणी सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत एकाचवेळी दोन तासात ३८४ नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या समन्वयाने ही कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रात अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भोसले यांनी पालकमंत्री चव्हाण आणि जिल्हाधिकारी इटनकर यांच्याशी चर्चा करून कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी आयसीएमआरच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला होता. पुढील दोन दिवसात याबाबतची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राची इमारत.

या इन्क्युबेशन केंद्रासाठी रुसाकडून ५ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. त्या निधीतून अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरण रिअल टाईम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात ३८४ कोरोना संसर्गाचे स्वॅब तपासता येतात. प्रयोगशाळेतील नमुने परीक्षणाचे काम इन्क्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ.जी.बी.झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यासाठी लागणारी विद्यापीठाच्या जैवतंत्रशास्त्र संकुलातील इतर उपकरणांचा वापरही केला जाणार आहे.  या तपासणीसाठी इन्क्युबेशन केंद्राच्या स्टार्टअपमधील कुशल व अनुभवी मनुष्यबळाबरोबरच बाहेरील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूकही केली जाणार आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या प्रयोगशाळेच्या १०० मीटर परिसरात कोणालाही येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यांत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तात्काळ औषोधोपचार करता येणे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा