आजपासून देशभरातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी, मॉल्समधील दुकाने मात्र बंदच!

0
3869
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेली देशभरातील रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सर्व दुकाने काही अटींवर आजपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दुकानदारांना दिलासा तर मिळणारच आहे, शिवाय गेल्या महिनाभरापासून ठप्प झालेल्या आर्थिक व्यवहारांनाही पुन्हा गती मिळण्यास मदत होणार आहे.

देशातील राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात दुकाने आणि आस्थापना कायद्यानुसार नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर उघडण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. या निर्णयानुसार आज शनिवारपासूनच हा आदेश लागू असेल. महानगरपालिका आणि नगर परिषद हद्दीतील आणि हद्दीबाहेरील निवासी कॉम्प्लेक्स, निवासी भागाचा परिसर आणि एकल दुकाने ५० टक्के कर्मचाऱ्यांसह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे आणि दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकाने बंदच राहतील.परंतुप महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरील मार्केट कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सिंगल ब्रॅण्ड आणि मल्टीब्रॅण्ड मॉल्समधील दुकाने उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. महानगरपालिका, नगर पालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोनमधील  कोणतीही दुकानेही लॉकडाऊन काळात बंदच रहातील. हा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्रीच सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा