घराबाहेरची लढाई लढण्यास तुमचे सरकार मजबूत, तुम्ही घरातच रहाः मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

0
53
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः हा काळ कोरोना विषाणूच्या गुणाकाराचाआहे. याच काळात हा विषाणू गुणाकार करतो आणि आपणाला त्याची वजाबाकी करायची आहे. हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. बाहेरची लढाई लढण्यासाठी तुमचे सरकार मजबूत आहे. तुम्ही घरातच रहा. घराबाहेर पडू नका. पोलिसांशी हुज्जत घालू नका. संयम आणि जिद्द कायम ठेवा. हेही दिवस निघून जातील आणि त्याची इतिहासात नोंद होई, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक आणि ट्विटरवर लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तुंचा अजिबात तुटवडा नाही. तुमच्या सोयीसाठी आपण चोवीस तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवली आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील गर्दी कमी झाली नाही तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. या लढाईत पुढची पावले उचलावी लागली तर तीही उचलू. बाहेरची लढाई लढण्यासाठी तुमचे सरकार भक्कम आहे. तुम्ही घरातच रहा, बाहेर पडू नका, असे ठाकरे म्हणाले.

गेले आठ दिवस आपण संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे. पण अजूनही काही लोक अनावश्यक बाहेर पडत आहेत. मग पोलिसांशी कुठे तरी हुज्जत होते. पोलिस सर्व भार स्वतःवरती घेत आहेत. तुम्ही संयमाचे अतुल्य दर्शन घडवत आहातच. पण काही वस्त्यांमध्ये वर्दळ होत आहे. ती कमी करा. ही आणीबाणी आहे. सरकारला कठोर निर्णय घ्यायला लावू नका, असे ठाकरे म्हणाले.

काही हजार प्रवाशी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे. ते क्वारंटाइनमध्ये राहतात की नाही, याची जबाबदारी आपण घ्यायची आहे. टार्गेट ग्रुप म्हणजे हाय रिस्क ग्रुप यांची आपणाला जास्त काळजी घ्यायची आहे. आपण राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत. आता  कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढणार आहे.  ती अपेक्षेप्रमाणे वाढली पाहिजे. ज्या लोकांना या विषाणूने ग्रासले होते ते घरी जात आहेत. आता खासगी डॉक्टर आणि हॉस्पिटल्सनी डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे. रुग्णामध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळतील. रूग्णांमध्ये सर्दी, खोकला ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना एक्स रे आणि हिमोग्राम करायला सांगा. त्यांची श्वास गती कशी आहे, हेही पहा. संशय आला तर त्यांना तत्काळ  कोरोनावर उपचार करणाऱ्या आपल्या पाठवा. हा विषाणू पहिल्या  पायरीवर थांबवला तर पुढे सरकत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आठ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन परिस्थितीत आहे. माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. महाविकास आघाडीतील सर्व नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा सुरू आहे. राज सुद्धा मला काही सूचना देत आहे. हे सकंट मोठे आहे. या संकटाशी लढण्यासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपण वेगळे अकाऊंट सुरू केले आहे. आज सकाळीच मला उदय कोटक यांचा फोन आला. त्यांनी दहा कोटी रुपयांची मदत या निधीसाठी जाहीर केली आहे. चहूबाजूंनी सगळे मदतीला येत आहेत. आपली टीम चांगली तयार झाली आहे.

संपूर्ण जगभरात या विषाणूने थैमान घातले आहे. कोणताही जग मदतीला धावून येईल, अशी परिस्थिती नाही. आपण आपलीच काळजी घ्यायची आहे. ज्या देशांनी काळजी घेतली नाही, त्यांची काय परिस्थिती आहे, हे आपण टीव्हीवर पहात आहोत. त्यामुळे आपण ही काळजी घेत आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा