८० कोटी रेशनकार्डधारकांना सरकार देणार दोन रूपये किलो गहू, तीन रूपये किलो दराने तांदूळ

0
114

नवी दिल्लीः देशभर वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने आता स्वस्तधान्य दुकानातून ८० कोटी राशनकार्डधारकांना मासिक कोटा दोन किलोग्रॅमने वाढवून प्रतिव्यक्ती सात किलोग्रॅम करण्याचा निर्णय घेतला असून दोन रूपये किलो गहू तर तीन रूपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयाशी संबंधित मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर सांगितले की, सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ८० कोटी लोकांना ७ किलोग्रॅम अन्नधान्य प्रतिव्यक्ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाची किंमत २७ रुपये प्रतिकिलो आहे, तो दोन रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जाईल. तांदळाचा खर्च जवळपास ३२ रुपये किलो आहे, परंतु स्वस्तधान्य दुकानांवर तो तीन रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जाईल. सर्व राज्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत केंद्र सरकारकडून अन्नधान्य घेण्यास सांगण्यात आले आहे, असे जावडेकर म्हणाले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सरकार ८० कोटींहून अधिक लोकांना अत्यंत सवलतीच्या दरात प्रतिमहिना प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य उपलब्ध करून देते. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अतिरिक्त अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण भारतीय खाद्य निगमकडे ( एफसीआय) गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा झाल्याने साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण  झाला आहे. त्यामुळे गहू आणि तांदळाचा साठा खुल्या जागेत ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी हा साठा संपला पाहिजे, असा भारतीय खाद्य निगम दबाव आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा