राज्यभरात किराणा मालाची चढ्या भावाने विक्री; स्थानिक प्रशासन मात्र सुस्तच!

0
102
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यभरात किराणा मालाची चढ्या भावाने विक्री करण्यात येत असून त्याकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा सुरळित पुरवठा करण्यात येत आहे. अन्यधान्याचा साठाही पुरेसा आहे, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात असले तरी राज्यभरातील जवळपास सर्वच किराणा दुकानदार लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन किराणा मालाची चढ्या भावाने विक्री करत आहेत. त्यासाठी ते आम्हालाच जास्त भावाने खरेदी करावी लागत असल्याचे कारण देत आहेत. परिणामी आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या सर्वसामान्य माणसाचे आर्थिक शोषण होत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केले जात आहे.

लॉकडाऊन घोषित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात किराणा दुकानदारांनी बेमुर्वतखोरपणे नफेखोरीला सुरूवात केली. याबाबतच्या तक्रारी वाढत असतानाच अशा किराणा दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे लॉकडाऊन टप्पा दोनमध्ये किराणा दुकानदारांची भीड चेपली आणि त्यांनी ग्राहकांची लूट सुरूच ठेवली आहे. आजघडीला दुकानदारांनी किराणा मालाचे भाव १५ ते २८ टक्क्यांच्या आसपास वाढवले आहेत. लॉकडाऊनच्या आधी ४५ रुपये किलो मिळणारे पोहे आता ५५ ते ६० रुपये किलो, ८२ रुपये किलो मिळणारे शेंगदाणे आता १२५ ते १३८ रुपये किलो, ३२ रुपये किलो मिळणारा रवा ५५ ते ५८ रुपये किलो, ३८ रुपये किलो मिळणारी साखर ४५ ते ५१ रुपये किलो तर ९० रुपयांना मिळणारी गोडेतेलाची बॅग आता ११० ते १३५ रुपयांना विकली जात आहे. काही वस्तुंच्या किंमती तर तब्बल दुप्पट वाढवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील किराणा दुकानदारांच्या या नफेखोरीवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही किराणा दुकानदार भाववाढ करून नफेखोरी करत आहेत. हे कृत्य व्यावसायिक नितिमत्तेत आणि माणुसकीमध्येही बसत नाही. असा प्रकार होत असल्यास लोकांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे आणि प्रशासनानेही अशा लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा