सरकारचा आदेश धाब्यावरः मुंबईतील लिलावती, हिंदुजा, जसलोक आणि बॉम्बे हॉस्पिटलला नोटीस

0
169

मुंबईः राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रूग्णालयांविरुद्ध धडक कारवाई हाती घेतली असून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल या चार बड्या रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत .याची दखल घेऊन काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना रात्री २ पर्यंत आरोग्यमंत्री टोपे यांनी खासगी रूग्णालयांना स्वतः भेटी दिल्या. या भेटीत सरकारच्या आदेशांची पूर्तता केली जात नसल्याचे निदर्शनास आल्यावरून त्यांनी ही कारवाई केली आहे.

 राज्य आरोग्यसेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या चार रूग्णालयांविरुद्ध ही कारवाई केली. काही रूग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेडबाबत माहिती दर्शवणारे फलक नव्हते. त्याच प्रमाणे राज्य सरकारने उपचारासाठी निश्चित केलेल्या दरानुसार दरपत्रकही लावण्यात आले नव्हते, असे आरोग्यमंत्री टोपे यांना या पाहणीत आढळून आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा