कोरोनानंतरचे उच्च शिक्षण कसे असेल?, सांगताहेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

0
191

एकदा जिज्ञासा आणि उत्कंठा निर्माण केली तर विद्यार्थी स्वयंप्रेरणेने उपयोग करू शकतात आणि जगात मोठ्या आत्मविश्‍वासाने वावरू शकतात. वर्तमानयुगात समान शिक्षणाचा विचार करताना आपल्यासमोर माहितीप्रधान, कौशल्यप्रधान व मूल्यप्रधान शिक्षणाचा विचार केला पाहिजे. जो समाज तंत्रदृष्टीने प्रगत आणि माहितीच्या दृष्टीने संपन्‍न आहे, असा समाज म्हणजे माहिती समाज निर्माण करायचा आहे आणि तो वैश्‍विक असणार आहे. या नव्या शिक्षणातून जग नव्या दिशेने झेपावू लागेल. या पार्श्‍वभूमीवर नवीन बदल अंमलात आणणे हे आपल्यापुढे खरे आव्हान आहे.

  • डॉ.प्रमोद येवले (कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)

प्रगतीसाठी बदल अर्थात परिवर्तन हे कोणत्याही क्षेत्रातील अटळ असे सूत्र असते.  विशेषतः कोणतीही आपत्ती आल्यावर त्यातून धडा घेऊन बदल तसेच उपायोजना कराव्या लागतात. आपत्ती मग ती मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक, यातून बाहेर पडण्यासाठी सर्व देश उपायोजना करत असतात. कोरोना अर्थात कोविड-१९ ही आंतरराष्ट्रीय आपत्ती मात्र अनपेक्षितरित्या येऊन धडकली आहे. जगभरात आजपर्यंत पंचावन्न लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून साडेतीन लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोणती आपत्ती येण्यापूर्वी विविध देश ‘पॉसिबल सिनॅरिओ बिल्डिंग’द्वारे पूर्वतयारी करत असतात. कोरोनाबद्दलची कल्पना मात्र कोणत्याही देशाला आली नाही. त्यामुळे साऱ्या जगावर हे संकट ओढवले आहे. याचा सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम होणार असून शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशात उच्च शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे सूत्र पाळून त्या प्रकारचे शिक्षण-संशोधन करावे लागेल. त्यासाठी अमूलाग्र बदल करावे लागतील. केवळ बाह्य बदल करून चालणार नाही. तर परिवर्तन घडण्यासाठी आपले ‘वर्तन’ बदलावे लागेल.

यंदाची ही परिस्थिती अपवादात्मक असल्यामुळे हे बदल करणे गरजेचे आहे.  मात्र कोरोनानंतरची परिस्थिती लगेच बदलेल असे म्हणता येणार नाही. कोरोनाचे संकट आणि फिजिकल डिस्टन्सिंगसह उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनासोबत जगण्याचे आपल्याला शिकावे लागणार आहे. तसेच कोरोना संकट काळातील उच्च शिक्षणही असणार आहे. या अनुषंगाने काही बदल परिणाम निश्चित होतील असे मला वाटते. गेल्या ४० वर्षांपासून उच्च शिक्षण, संशोधन यामध्ये मी प्रत्यक्ष कार्यरत असल्यामुळे काही गोष्टी सांगता येतील. एक मात्र निश्चित आहे, या काळात एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे तसेच आपत्तीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल करावे लागणार असल्याचेही पहिल्यांदाच अनुभवयास मिळत आहे. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हणतात, त्याप्रमाणे कोरोनानंतरची शिक्षणातील गरज ओळखून आपल्याला बदल करावे लागतील, याचा ऊहापोह मी पुढील प्रमाणे करत आहे.

कोरोनानंतर राज्य शासनाने लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच महाविद्यालये व विद्यापीठांना सुट्ट्या देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुटया देऊन सर्व वसतिगृहे रिकामी करून घेण्यात आली. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हे करणे गरजेचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून अर्थात १९५८ पासून पहिल्यांदाच अडीच महिन्यांपासून विद्यापीठ महाविद्यालये पूर्णतः बंद असल्याचे घडले आहे. सुदैवाने अभ्यासक्रम बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे फार अडचण आली नाही. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच बहुतांश विद्यार्थी हे सुरक्षितपणे आपल्या घरी, गावी पोहोचले होते. तथापि विविध विभागांनी ऑनलाइन अभ्यासक्रम, झूम अॅप तसेच समाज माध्यमाच्याद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवला आहे. मी स्वतः देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे. वेळोवेळी विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची माहिती संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना कळवण्यात येत आहे.

 एक गोष्ट खरी आहे की, विद्यापीठे, महाविद्यालयांना लॉकडाऊनमुळे अशाप्रकारे बंद करावे लागण्याची घटना पहिल्यांदाच घडली. मात्र ही अपरिहार्यता होती, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. यातून सावरून आम्ही लगेच ऑनलाईन बैठका व आणि उपायोजना करून तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे बऱ्यापैकी कामकाज घडवून आणले. लॉकडाऊननंतर विद्यापीठ सुरू होईल तेव्हा आम्ही कमीत कमी काळात विद्यापीठ प्रशासनाचा गाडा सुरळीत आणण्याचा प्रयत्न करू.

कोरोनानंतर राज्य शासन व विद्यापीठ अनुदान आयोग या दोन्ही घटकांनी कुलगुरू व शिक्षणतज्ञांची समिती नेमून काय उपाययोजना करता येतील याबद्दल प्रयत्न केले आहेत. या काळात मा. राज्यपाल तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सचिव व संचालकस्तरावरच्या बैठका नियमितपणे सुरू आहेत. पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षांबद्दल वरिष्ठ पातळीवरून ज्याप्रमाणे निर्णय घेण्यात येतील, तशी अंमलबजावणी विद्यापीठ करणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य परीक्षा रद्द करण्या बद्दल निर्णय झाला आहे. तर अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा अपवादात्मक परिस्थितीत घेण्यात आलेला असल्यामुळे त्याचा नेमका काय परिणाम होईल हे आजच सांगणे कठीण आहे. आगामी वर्षात मात्र कोरोनाचे संकट ध्यानात घेऊन अभ्यासक्रम, तासिका, प्रात्यक्षिके, परीक्षा, निकाल या सर्वबद्दलचे एक निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे.

…………………………………..
गांधीजींनी ‘नई तालीम’ या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, ‘मन, मस्तिष्क आणि हाथ’ अर्थात मन, मनगट आणि हृदय यांच्यामध्येसुद्धा एक नवी शक्‍ती संचारण्याचे सामर्थ्य प्रगत तंत्रज्ञानामध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना डिजिटल शिक्षणाचा विस्तार करताना नैतिक मूल्यांचा आग्रह धरला पाहिजे. समाजाची धारणा करतो तो धर्म. ही जी संकल्पना मागे पडत आहे, समाजाची घडण करते ते खरे शिक्षण, असे समाजाची आणि राष्ट्राची धारणा निर्माण करणाऱ्या चारित्र्यसंपन्‍न व्यक्‍ती निर्माण करणारे डिजिटल शिक्षण आपणास पेलवेल का, याचाही विचार करायला हवा.
…………………………………..

पदवीच्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राची परीक्षा वगळता महाविद्यालयांच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पदवीच्या केवळ अंतिम वर्षांच्याच परीक्षाबद्दल वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय कळविण्यात येईल. बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात अन्य परीक्षांचे निकाल लॉकडाऊन उठल्यानंतर घोषित केले जातील. त्यानुसार पुढील वर्गात प्रवेश झालेले विद्यार्थ्यांच्या तासिका एक ऑगस्टपासून सुरू करता येणार आहेत. तथापि यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य उपायोजना करावी लागणार आहेत.

 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पुढील वर्षाचे वेळापत्रक करण्यात येणार आहे. त्या तुलनेत याला थोडा विलंब होणार असला तरी आगामी काळात हा फरक भरून काढावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालये तूर्तास तरी बंदच राहणार आहेत. पुढील वर्षाच्या प्रवेशापासून ते निकालापर्यंत या सर्व परिस्थितीचा विचार करूनच विद्यापीठ तसेच राज्य व केंद्र स्तरावर निर्णय घ्यावे लागणार आहेत. विद्यापीठ स्तरावर आम्ही अधिकार मंडळाच्या बैठका घेऊन तसे नियोजन केले आहे .

आगामी वर्षाची प्रवेश प्रक्रिया व वार्षिक वेळापत्रक याबद्दल स्पष्ट निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे फारशा तांत्रिक अडचण येतील, असे मला वाटत नाही. तथापि विद्यार्थ्यांची नियमित तासिका व प्रात्यक्षिकांना हजेरी लावताना फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य घटकांचा विचार करावा लागणार आहे. या आजाराचे संक्रमण विद्यार्थी -शिक्षक यांच्यात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी अध्यापन व मूल्यांकन पध्दतीत बदल करावे लागतील. तसेच पारंपारिक अध्यापन पद्धती बदलावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्याची केवळ सत्र/वार्षिक परीक्षा घेऊन चालणार नाही. तर सतत मूल्यांकन पद्धती (Continues Evaluation System) अंमलात आणावी लागणार आहे.

आपल्या सर्वांना अचानकपणेपणे लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यापीठांनी आखलेल्या काही योजना लागू करण्यास विलंब झाला. मात्र या योजनांना संपूर्णतः खीळ बसली, असे मला वाटत नाही. मी तर ही परिस्थिती आणि एक दिवस अपरिहार्यपणे असणारच आहे, असे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन सुरू केले आहे. अशाही स्थितीत कल्पनेतील योजना व प्रकल्प पुढे नेण्यात येतील. कोरोनानंतरच्या परिस्थितीत गरज असणारी आणखी काही नवीन प्रकल्प हाती घेण्यात येतील. विशेषतः विद्यापीठांना देखील आगामी काळात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून काही प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहेत. तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून निधी जमा करून प्रकल्प राबवावे लागणार आहेत. कोरोनानंतरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ शासनस्तरावर प्रयत्न करून चालणार नाही तर विद्यापीठासारख्या संस्थांनाही सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन काम करावे लागेल. आम्ही त्याप्रमाणे मास्क बनवणे, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर निर्मिती प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात स्वयंसेवक नेमण्यात आले असून ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे.

 डिजिटल शिक्षण: डिजिटल युगात ई-लर्निंगची व्याख्या करताना असे म्हटले जाते, लर्निंग इलेक्ट्रॉनिकली, इफेक्टिव्हली व इझिली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून शिक्षण प्रभावशाली, सुलभपणे आणि गतिमान शिक्षण दिले जाते त्याला ई-लर्निंग म्हटले जाते. डिजिटल युगातील शिक्षण गतिमान आहे. अद्ययावत आहे; पण तेवढेच ते कालसुसंगत आहे, हे आपण लक्षात घ्यावे लागणार आहे. कोरोनानंतर नियोजन करतांना डिजिटल शिक्षणाचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे डिजिटल युगातील शिक्षणाचा विचार करत असताना आपल्याला ऑनलाईन लर्निंग, ई-लर्निंग तसेच इंटरनेटद्वारे घेतलेले शिक्षण आदी अनेक पैलूंचा समावेश करावा लागेल. डिजिटल युगातील प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षण, संशोधनापर्यंत अलीकडे लॅपटॉप, आयपॅड ते टेबलावरील संगणकापासून हातातील मोबाइलच्या इंटरनेटपर्यंत सर्वच साधनांचा उपयोग केला जात राहील. शैक्षणिक प्रक्रिया गतिमान करण्यात वर्तमान जगात इंटरनेटचे विशेष महत्त्व आहे. अलीकडील काळात क्लासरूम स्मार्ट होत आहे. वर्गात विद्यार्थी, शिक्षक इंटरनेटचा वापर करून पडद्यावर चित्र पाहून, प्रत्यक्ष आवाज ऐकून शिक्षण घेत आहेत.

अध्ययन व्यवस्थापन प्रणालीचा विकासः डिजिटल शिक्षणाबद्दलचे फायदे सांगताना असे म्हटले जाते की, हे शिक्षण सहजपणे उपलब्ध होते. ते प्रभावी आंतरक्रिया करणारे असते. ते ज्ञानाचे किंवा शिकणार्‍याचे सक्षमीकरण करणारे असते. शिकणारा आणि शिकवणारा याला एकाच व्यासपीठावर आणणारे असते. ज्ञानाची पातळी उंचावणारे असते. अनेक अभ्यासकांना पारंपरिक शिकण्याच्या पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती याचा तुलनात्मक अभ्यास करताना असे लक्षात आले की, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले जाणारे शिक्षण हे अधिक सखोल, दूरगामी आणि सर्वसमावेशक आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा आग्रह आपण उच्चशिक्षणात करणे आवश्यक आहे. तथापि, यासंदर्भात काही पैलू लक्षात घ्यायला हवेत. संगणकाधारित, ऑनलाइन शिक्षण आणि ई-लर्निंग याबरोबरच शिक्षणामध्ये अध्ययनाच्या व्यवस्थापन प्रणालीचा विकास झालेला आहे. तसेच लर्निंग कंटेट मॅनेजमेंट म्हणजे शिक्षणातील आशयाचे व्यवस्थापन कसे करावे, यावरही भर दिला जात आहे.

आंतरक्रियात्मक ज्ञान हे नव्या युगाचे वैशिष्ट्येः प्रगत तंत्रज्ञान अधिक सहाय्यभूत ठरते. आशय व्यवस्थापनाप्रमाणे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट सिस्टिम म्हणजे आभासी वातावरणनिर्मिती. स्मार्ट क्लासरूममध्ये व्हर्च्युअल क्लासरूम निर्माण केली जाते. आभासी वर्गात जगातील कोणत्याही व्यक्‍तीचे ज्ञान, भाषण ऐकू शकतो आणि त्या व्यक्‍तीशी आपण बोलू शकतो. ही व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा आभासी वास्तव नव्या शिक्षणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नव्या डिजिटल युगात अंतराचा नाश झाला आहे. व्यक्‍ती आणि व्यक्‍तीचे विचार, त्याचे हावभाव, चेहरा अभिव्यक्‍तीच्या विविध शैली, त्याचे सूक्ष्म पैलू आपल्याला समोर पडद्यावर दिसतात आणि समोरची व्यक्‍ती खुलासा करूनही घेऊ शकते. तेव्हा आंतरक्रियात्मक ज्ञान हे नव्या युगाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

कूटप्रश्नांचे सहज शिक्षणः इंटरनेट युगातील शिक्षणाच्या आणखी काही वैशिष्ट्यांचा जरूर उल्लेख केला पाहिजे. या शिक्षणामध्ये प्रतीकांची निर्मिती आणि हाताळणी केली जाते. त्याला लर्निंग ऑब्जेक्ट असे म्हटले जाते. समजा, मानवी विकास कसा झाला त्याचे चित्रण करायचे असेल तर विविध पद्धतीने मानवी विकास कसा झाला ते आपण चित्रांद्वारे दाखवू शकतो. अशाप्रकारचे लर्निंग ऑब्जेक्टस् क्रमाक्रमाने विकसित केले जातात. विज्ञानामधील प्रयोग, गणितातील विविध पातळींवरील गोष्टी, त्याच्यातील विविध कूटप्रश्‍न याचे शिक्षण आपण सहजपणे घेऊ शकतो.

शैक्षणिक वाहिन्यांचा वापरः विद्यापीठ अनुदान मंडळाने ‘व्यास’ या नावाने एक वाहिनी तयार केली आहे. त्यातून कला, साहित्य, सामाजिकशास्त्रे याचे शिक्षण दिले जाते. ‘एकलव्य’ तंत्रज्ञान वाहिनीत तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते. तसेच ‘ज्ञानदर्शन १’ आणि ‘ज्ञानदर्शन २’ या वाहिन्या आहेत. इंदिरा गांधी मुक्‍त विद्यापीठाचीही वाहिनी आहे. त्यातूनही शिक्षण दिले जाते. त्याशिवाय अनेक खासगी शैक्षणिक वाहिन्या आहेत. सरकारी शैक्षणिक वाहिन्या मोफत उपलब्ध आहेत आणि अभ्यासक्रमही मोफत उपलब्ध आहेत. त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे.

…………………………………
नव्या युगातील हे नव्या ज्ञानाचे, संस्कृतीचे आणि परिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य भारतीय शिक्षण व्यवस्थेच कसे येईल, हाच खरा प्रश्‍न आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र व राज्य सरकार तसेच विद्यांपीठांनी कोरोनानंतरच्या शिक्षणाच्या नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निश्चित आपला खारीचा वाटा उचलेल, असा विश्वास मला वाटतो. शेवटी ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरायमः’ याप्रमाणे शिक्षण हे कल्याणाचे समाजीकरण करण्यात आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यात यश मिळू शकेल.
…………………………………

डिजिटल युनिव्हर्सिटीची निर्मितीः शैक्षणिक उपग्रहांद्वारे भारतातील सर्वच विद्यापीठांना एकमेकांना जोडण्याचे कार्य करून डिजिटल युनिव्हर्सिटी प्रस्थापित करण्याचे कार्य करणे सध्या सहजशक्य झाले आहे. भारतातील अनेक विद्यापीठे प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च शिक्षण सर्वांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचवत आहेत. आगामी काळात व्यवसाय करत शिकण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाला संकेतस्थळावरून तसेच ऑनलाइन शिक्षण घेता येणार आहे.

अनेक साधनांद्वारे ज्ञानग्रहणः अलीकडे जीवन शिक्षण कौशल्ये (लाइफ स्कील) ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. मार्कर यांनी म्हटल्याप्रमाणे, विद्यापीठे ही मानव संसाधनाची स्थळे असतात. ती वैश्‍विक धारणा निर्माण करतात. संशोधन, अध्यापन, अध्ययन आणि विस्तार या चार महत्त्वाच्या पायर्‍या आहेत. त्या प्रत्येक पायरीवर डिजिटल युगातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही शंका राहू नयेत, त्यांनी केवळ एकच पुस्तक वाचू नये, अनेक साधनांचा वापर करून ज्ञान ग्रहण करावे म्हणून आग्रह धरला जात आहे.संशोधनासाठी अध्यापन, अध्ययनाप्रमाणे संशोधनासाठी आवश्यक सूची तयार करणे, ग्रंथसूची करणे, विविध नियतकालिकांमधील लेखांचा पडताळा घेणे याबाबतीत इंटरनेट वरदानच ठरत आहे.

व्यवहार्यतेकडे लक्ष हवेः तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यातील धोक्यांकडे लक्ष दिले पाहिजे. प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराचे जसे लाभ आहेत, तशा काही मर्यादाही आहेत. इंटरनेट युगातील शिक्षण वरदान ठरत आहे; पण त्याचवेळी मार्गात अडचणीसुद्धा आहेत. या विविध प्रकारच्या समस्यांचे भान ठेवून नव्या ज्ञानयुगातील साधनांचा योग्य, नैतिक वापर केला पाहिजे. विशेषतः मराठवाडा विदर्भासारख्या भागातील अनेक गावांमध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यास आणखी वेळ द्यावा लागणार आहे. अमलात आणताना फिजिबिलिटी लक्ष द्यावे लागणार आहे.

कृतीशील आणि संकल्पनात्मक शिक्षणः जागतिकीकरणानंतर गेल्या तीस वर्षात भारतातील शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होत आहेत. विशेषतः सद्यस्थितीत उच्च शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येत आहेत. शिक्षणाची उपलब्धता आणि संधी यापुढे एक पाऊल टाकून उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा संबंध रोजंदारी देण्यायोग्य असे मनुष्यबळ तयार करण्याशी आहे, हे समजून अभ्यासक्रमाची फेररचना करावी लागेल. केवळ पदवी आणि गुण मिळवून हे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळेच सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कृतीशील आणि संकल्पनात्मक शिक्षणाचा विचार हा त्याचा पाया आहे. त्यामुळे कौशल्य विकासाला चालना मिळून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होण्यास मदत होईल.

कम्युनिटी कॉलेजची संकल्पनाः कौशल्य विकासाचा विचार अनेक दशंकापासून होत असला तरी उच्च शिक्षणावरील त्याचा प्रभाव नगण्यच राहिला आहे. कौशल्य हा पारंपारिक अभ्यासक्रमाचा अंतर्भूत घटक न होण्यामुळे हे घडले. आता ‘निवडीवर आधारित श्रेयांकन पद्धत’ अनिवार्य केल्यामुळे कौशल्य विकासाला चालना मिळेल. कारण या पद्धतीत कौशल्य विकासाची चौकट तयार करण्यात आली आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना पारंपारिक अभ्यासक्रमाशी समकक्षता देण्यात आली आहे. पारंपारिक महाविद्यालयाबरोबरच कम्युनिटी कॉलेजची संकल्पना राबवण्यात येत आहे.

…………………………………
विद्यार्थ्यांची नियमित तासिका व प्रात्यक्षिकांना हजेरी लावताना फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य घटकांचा विचार करावा लागणार आहे. या आजाराचे संक्रमण विद्यार्थी -शिक्षक यांच्यात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी अध्यापन व मूल्यांकन पध्दतीत बदल करावे लागतील. तसेच पारंपारिक अध्यापन पद्धती बदलावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्याची केवळ सत्र/वार्षिक परीक्षा घेऊन चालणार नाही. तर सतत मूल्यांकन पद्धती (Continues Evaluation System) अंमलात आणावी लागणार आहे.
…………………………………

कौशल्याधारित अभ्यासक्रमांवर भरः व्यवसाययोग्य मनुष्यबळ तयार करण्याच्या पद्धतीत मूलभूत क्षमता विकासाबरोबरच उद्योगात असणे जरूरीचे असते. एकविसाव्या शतकात हाच कळीचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल हे झटपट आणि अनपेक्षित असे आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाच्या काळात कोणती कौशल्ये विकसित करावीत, याचा विचार करून अभ्यासक्रम तयार करावे लागतील. स्वयंसारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. कौशल्यावर आधारित कोर्सेस सुरू करावे लागणार आहेत. पदवी आणि पदव्युत्तरस्तरावर अशा पद्धतींना पूरक अशा प्राथमिक कौशल्यांची ओळख आणि प्रशिक्षण देता येईल. त्याचप्रमाणे नवीन पद्धती विकसित करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. उच्च शिक्षणातील कौशल्य विकास घटकात यांचा समावेश करावा लागेल. आरोग्य, कृषी, सौंदर्य प्रसाधने, ऊर्जा, यंत्रमानव, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये तसेच एफएमसीजी क्षेत्रात हे कोर्सेस उपयुक्त ठरणार आहेत. यासाठी आंतरविद्याशाखीय विचारसरणी अवलंबावी लागेल.

पारंपरिक पदवी शिक्षणाला पूरक अभ्यासक्रमांची जोडः कौशल्य विकासाचे प्रशिक्षण अभ्यासक्रम अनेक स्तरावर चालवले जातात. माध्यमिकस्तरांपासून या प्रशिक्षणाची सुरूवात होते. उच्च शिक्षणात पाचव्या स्तरानंतरचे अभ्यासक्रम येतात. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरांवर अशा प्रशिक्षणाची सोय केली जाते. पारंपारिक पदवीचे शिक्षण घेतांना पूरक अभ्यासक्रमाद्वारे ही कौशल्ये आत्मसात करता येणे शक्य आहे. विशेषत: सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ याद्वारे निर्माण करता येईल. कुशल मनुष्यबळाची आवश्यकता याद्वारे पूर्ण करता येईल. भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा विकास आणि उपयोजन यासाठी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

आव्हाने आणि अडचणीः एकंदरीत कोरोनानंतरची परिस्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता, संसधानाची उपलब्धता याविषयी विचार करावे लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, एकदा जिज्ञासा आणि उत्कंठा निर्माण केली तर विद्यार्थी स्वयंप्रेरणेने उपयोग करू शकतात आणि जगात मोठ्या आत्मविश्‍वासाने वावरू शकतात. वर्तमानयुगात समान शिक्षणाचा विचार करताना आपल्यासमोर माहितीप्रधान, कौशल्यप्रधान व मूल्यप्रधान शिक्षणाचा विचार केला पाहिजे. जो समाज तंत्रदृष्टीने प्रगत आणि माहितीच्या दृष्टीने संपन्‍न आहे, असा समाज म्हणजे माहिती समाज निर्माण करायचा आहे आणि तो वैश्‍विक असणार आहे. या नव्या शिक्षणातून जग नव्या दिशेने झेपावू लागेल. या पार्श्‍वभूमीवर नवीन बदल अंमलात आणणे हे आपल्यापुढे खरे आव्हान आहे. यासंदर्भात विविध समस्यांचा, अडचणींचा परामर्श घेऊन आपणास पुढचा टप्पा गाठायचा आहे.

मन, मनगट आणि हृदयाचा विकासः संयुक्‍त राष्ट्र संघाच्या सहस्राब्दी लक्ष्यानुसार, जगामध्ये नऊ प्रमुख समस्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी समस्या असेल ती सर्वांना समान आणि मोफत शिक्षण देण्याची. दारिद्र्य नष्ट करण्याची. पर्यावरणाच्या संतुलनाच्या बाबतीत विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण हाच आधार आहे. सर्वांना शिक्षण मिळाले, तंत्रज्ञान मिळाले, तंत्रज्ञानाचे सामाजिकीकरण झाले, तर मानवी समाज अधिकाधिक तीव्र गतीने कल्याणाच्या दिशेने वाटचाल करेल. अशा कल्याणकारी मानवी समाजाची निर्मिती करण्याचे डिजिटल युगातील शिक्षण हेच साधन आहे. याचे भान ठेवून नैतिक मूल्यांची अभ्यासरूपी जोड दिल्यास शिक्षणातून चारित्र्यनिर्मिती होऊ शकेल. गांधीजींनी ‘नई तालीम’ या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, ‘मन, मस्तिष्क आणि हाथ’ अर्थात मन, मनगट आणि हृदय यांच्यामध्येसुद्धा एक नवी शक्‍ती संचारण्याचे सामर्थ्य प्रगत तंत्रज्ञानामध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना डिजिटल शिक्षणाचा विस्तार करताना नैतिक मूल्यांचा आग्रह धरला पाहिजे. समाजाची धारणा करतो तो धर्म. ही जी संकल्पना मागे पडत आहे, समाजाची घडण करते ते खरे शिक्षण, असे समाजाची आणि राष्ट्राची धारणा निर्माण करणाऱ्या चारित्र्यसंपन्‍न व्यक्‍ती निर्माण करणारे डिजिटल शिक्षण आपणास पेलवेल का, याचाही विचार करायला हवा. नव्या युगातील हे नव्या ज्ञानाचे, संस्कृतीचे आणि परिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य भारतीय शिक्षण व्यवस्थेच कसे येईल, हाच खरा प्रश्‍न आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र व राज्य सरकार तसेच विद्यांपीठांनी कोरोनानंतरच्या शिक्षणाच्या नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निश्चित आपला खारीचा वाटा उचलेल, असा विश्वास मला वाटतो. शेवटी ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरायमः’ याप्रमाणे शिक्षण हे कल्याणाचे समाजीकरण करण्यात आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यात यश मिळू शकेल, अशी अपेक्षा करूयात!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा