कोरोनानेही दाखवली जातः औरंगाबादेत २४.९६ % मुस्लिमांत अँटिबॉडीज, हिंदूंचे प्रमाण ८.९६ टक्केच!

0
2361

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना बाधितांची दररोजची संख्या तीनशे- साडेतीनशेच्या आसपास असतानाच शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या ( घाटी) सामाजिक औषधीशास्त्र विभागाने केलेल्या या सर्वेक्षणात औरंगाबादेत कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचा निष्कर्ष काढलाच शिवाय जातनिहाय कोरोना विरोधी अँटीबॉडीजचा तपशीलही जाहीर केला आहे. त्यात सर्वाधिक अँटिबॉडीज मुस्लिमांमध्ये आढळून आल्या आहेत तर सर्वात कमी अँटिबॉडीज शहरातील हिंदूंमध्ये आढळून आल्या आहेत.

१० ते १६ ऑगस्ट दरम्यान शहरातील ११५ वॉर्डात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, शहरातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या  २४.९६ टक्के मुस्लिमांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. त्या खालोखाल १५.२८ टक्के बौद्ध लोकसंख्येत अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात शिखांची लोकसंख्या कमी असली तरी त्यांच्यातील ११.११ टक्के लोकसंख्येत कोरोना विरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. सर्वात कमी अँटिबॉडीज आढळण्याचे प्रमाण हिंदू लोकसंख्येमध्ये असून हे प्रमाण केवळ ८.९६ टक्के आहे. अन्य धर्मियांत अँटिबॉडीज आढळण्याचे प्रमाण ७.१४ टक्के एवढे आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरूवात, आता कोणालाही लागण होण्याचा धोका!

 विशेष म्हणजे या सेरो सर्वेक्षणात शहरातील एकूण हिंदू लोकसंख्येच्या ७७ टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. १५ टक्के मुस्लिम लोकसंख्या आणि ७ टक्के बौद्ध लोकसंख्या या सेरो सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आली आहे. सेरो सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या अन्य धर्म/ जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण केवळ १ टक्का आहे. औरंगाबाद शहरातील ४३२७ लोकांचे हे सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत विनामास्क फिरणाऱ्यांना रोख दंडासह मिळणार मास्क!

४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक अँटिबॉडीजः या सेरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, शहरातील झोपडपट्टी भागातील ४१ ते ५० वयोगटातील १७.४२ लोकांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. झोपडपट्टी भागातील १८ ते २० वयोगटातील लोकसंख्येत १०.५३ टक्के लोकसंख्येत या अँटिबॉडीज आढळल्या आहेत. झोपडपट्टी वगळता अन्य भागात १८ ते २० वयोगटातील लोकसंख्येत हे प्रमाण १२.१० टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा