मूळ व्हिडीओत म्हटले होते ‘ओए बस्स’, लोकांनी व्हायरल केले ‘शोएब बस्स’!

1
839
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पालघरमधील झुंडबळीच्या घटनेबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  आज मोठा खुलासा केला. या घटनेशी संबंधित एका व्हिडीओत ‘ओए बस्स’ असा आवाज ऐकू येतो. परंतु काही लोकांनी तो आवाज ‘शोएब बस्स’ असे ऐकून व्हायरल केला, असे सांगत गृहमंत्री देशमुख यांनी काही लोक या प्रकरणाला जातीय वळण देऊन मुंगेरीलाल के हसीन सपने पहात आहेत, असा सणसणीत टोला लगावला.  यामुळे समाजात फेकन्यूज कशा पसरवल्या जातात, हेही समोर आले आहे.

गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटर लाइव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी पालघर घटना आणि खंडाळ्याहून महाबळेश्वरला दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाच्या प्रकरणावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. पालघर झुंडबळी प्रकरणी अटक केलेल्या ११० आरोपींमध्ये एकही मुस्लिम नाही, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले आहे.

राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आहे. राज्यातील सर्व यंत्रणा कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढत आहे. आज काही राजकारण करण्याची वेळ नाही. तर एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढण्याची वेळ आहे. अशा परिस्थितीतही काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला लगावत त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

पालघर झुंडबळी प्रकरणी अटक केलेल्या १०१ आरोपींची यादीही गृहमंत्री देशमुख यांनी समाजमाध्यमावर शेअर केली आहे. पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी येथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती. त्यांनी ती नक्की पहावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन काळात खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचलेले डीएचएलएफचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासह २३ जणांचा संस्थात्मक क्वारंटाइनचा कालावधी आज दुपारी २ वाजता संपत आहे. त्यांचा क्वारंटाइन कालावधी संपत असल्यामुळे पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घ्या, असे आम्ही सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालयाला ( ईडी) १७ एप्रिलला कळवले आहे. जोपर्यंत सीबीआय त्यांना घेऊन जात नाही, तोपर्यंत ते कुटुंब आमच्याच ताब्यात राहील. सीबीआय अप्रोच केल्यावर आम्ही त्यांना ताब्यात देऊ, असे देशमुख म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा