अखेर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उघडली, पण ग्राहक फिरकलेच नाही,झाला तो बारवाल्यांचाच धंदा!

0
63

मुंबईः कोरोना संसर्गाच्या संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बंद झालेली हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार तब्बल १७४ दिवसांनंतर सोमवारपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी सकाळीच हॉटेलचे दरवाजे उघडले खरे, मात्र ग्राहकच येत नसल्याचा अनुभव बहुतांश हॉटेल चालकांना येत आहे. अद्यापही ग्राहक पार्सल घेऊन जाण्यावरच भर देत असल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे आज पहिल्या दिवशी बारवाल्यांचा मात्र बऱ्यापैकी धंदा झाला.

राज्य सरकारने पाच ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वेही घालून दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हॉटलमधून पार्सलसेवा सुरू झाली होती. त्यामुळे किचन सुरू होतेच. सोमवारी सकाळी नियमानुसार बैठक व्यवस्था करून हॉटेलचालकांनी तयारी केली. मात्र, अद्याप ग्राहक येण्यास तयार नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे बार आणि नॉन व्हेजकडे ग्राहकांचा कल असला तरी व्हेज हॉटेलांना अद्याप ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

करोना संसर्गाच्या काळात लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढते म्हणून नॉनव्हेजकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येते. पार्सल सेवा सुरू असल्याच्या काळातही हाच अनुभव येत होता. सध्याची मागणी विचारात घेता पौष्टिक, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या भाज्यांच्या आणि खाद्यांच्या डीशही सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे.करोनासंबंधी आता दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. दररोज आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता दक्षता घेण्याचीही लोकांना सवय झाल्याने बाहेर जाण्यापेक्षा घरीच खाण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.

ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यताः भाज्यांचे वाढलेले भाव, नोकरांना द्यावा लागणारा जास्तीचा पगार, करोनासंबंधी घ्यायच्या विविध दक्षता यामुळे हॉटेलचालकांचा खर्च वाढणार आहे. यामुळे लोकांना हॉटेलमध्ये खानपानासाठी पहिल्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. आता लगेच भाववाढ झालेली नसली तरी नजीकच्या भविष्यात ती केली जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा