कोणी रेल्वे रूळावर झोपत असेल तर त्याला कोण रोखू शकणार?: औरंगाबादच्या घटनेवर सुप्रीम कोर्ट

0
363
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोणी रेल्वे रूळावर झोपत असेल तर त्याला कोण रोखू शकणार? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबादेतील करमाडजवळ घडलेल्या रेल्वे अपघातप्रकरणी दाखल याचिकेवर केला आहे. कोण पायी जात आहे आणि कोण नाही, यावर लक्ष ठेवणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायाने म्हटले आहे.

जालना येथील स्टील कारखान्यात काम करणारे मजूर रेल्वे रूळ मार्गानेच पायी चालत औरंगाबादकडे येत असताना रात्र झाल्यामुळे रेल्वे रूळावरच झोपले असता मालगाडीने त्यांना चिरडले होते. त्यात १६ मजूर ठार झाले होते. ८ मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत अलख अलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत स्थलांतरित मजुरांसाठी निवार आणि मोफत वाहतूक व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी केली होती. न्या. एल. नागेश्वर राव, न्या. संजय किशन कौल आणि न्या. बी. आर. गवई यांच्या त्रिदस्यीय न्यायपीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आला असता न्यायालयाने ही टिप्पणी केली.

प्रत्येक वकील वृत्तपत्रात घटना वाचतो आणि प्रत्येक विषयाबाबत ज्ञानी होतो. तुमचे ज्ञान हे पूर्णतः वृत्तपत्रांच्या कात्रणांवर आधारलेले आहे आणि कलम ३२ अन्वये न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा अशी तुमची इच्छा आहे. सरकारलाच निर्णय घेऊ द्या. न्यायालयाने तुमच्या अर्जावर सुनावणी किंवा निर्णय का घ्यावा?, असा सवाल न्या. संजय किशन कौल यांनी यावेळी केला. स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात असताना पायी चालत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. न्यायालयाने तुम्हाला विशेष पास मंजूर केला तर तुम्ही जाऊन सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणार का?  असा सवालही न्या. कौल यांनी याचिकाकर्त्याला केला.

रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना रोखण्यासाठी काही मार्ग आहे का, अशी विचारणा न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे केली. राज्यांनी आंतरराज्य वाहतूक सुविधा पुरवत आहेत. परंतु आपला नंबर येण्याची वाट पाहण्याऐवजी लोक चिडले आणि पायी चालायला लागले तर काहीही केले जाऊ शकत नाही. लोकांनी पायी चालत जाऊ नये, एवढीच विनंती आपण करू शकतो. त्यांना थांबवण्यासाठी बळाचा वापर करण्याचे उलट परिणाम होतील, असे मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडल्यामुळे शहरांमध्ये अडकून पडलेले लाखो स्थलांतरित मजूर पायी चालतच आपल्या गावाकडे निघाले आहेत. त्यापैकी अनेक मजुरांचा रस्त्यातच अपघात आणि उपासमार व थकव्यामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा