विद्यापीठ बदलले की अभ्यासक्रम बदलतो, मग सामायिक परीक्षा घेणार कशी?

0
87
प्रतिकात्मक छायाचित्र.

प्रमिला सुरेश / मुंबईः
महाराष्ट्रावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेल्या विद्यापीठस्तरीय परीक्षा लवकर आटोपून लगेच निकाल लावता यावेत म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सर्व विद्या शाखांच्या सामायिक परीक्षा घेण्याचा विचार राज्य सरकार करत असले तरी हा प्रयोग सोयीपेक्षा जास्त कसरतीचाच ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कोणत्याही विद्या शाखेच्या अभ्यासक्रमात एकसूत्रता नाही. विद्यापीठ बदलले की प्रत्येक विद्या शाखेचा अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाचा तपशीलही बदलतो. त्यामुळे सामायिक परीक्षा घेणार कशी? असा महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

निर्धारित वेळापत्रकांप्रमाणे राज्यातील विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा मार्च- एप्रिल महिन्यात घेण्यात येतात. बहुतांश विद्यापीठांनी परीक्षेची तयारी पूर्ण करून वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र यावर्षी ऐन परीक्षेच्या हंगामातच महाराष्ट्रावर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राज्यातील कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेत विद्यापीठांची सामायिक परीक्षा घेण्याबाबत विचार करावा, अशी सूचना कुलपतींनी कुलगुरूंना केली.

 राज्यपाल तथा कुलपतींकडून ही सूचना येण्याच्या आधीच उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे विद्यापीठांची सामायिक परीक्षा घेण्याच्या आधीपासूनच तयारी लागलेले असल्याचे मंगळवारीच स्पष्ट झाले. सामायिक परीक्षा घेण्याचा विचार करा, अशी सूचना राज्यपालांनी केल्यानंतर राज्यातील विद्यापीठांच्या सामायिक परीक्षा घेता येतील का, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंची समिती स्थापन केल्याचे आणि ही समिती लवकरच सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सामंत यांनी याच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले.

अडचणी काय?:
१.
महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कोणत्याही विद्या शाखेच्या अभ्यासक्रमात एकसूत्रता नाही. सकृत दर्शनी विषयांची नावे सारखी वाटत असली तरी त्याच्या तपशीलात जमीन अस्मानचे अंतर आहे. उदाहरणार्थः मानव्यविद्या शाखेत समाजशास्त्र, इतिहास अशा विषयांची नावे सारखी वाटत असली तरी या विषयांमध्ये शिकवला जाणारा तपशील वेगवेगळ्या विद्यापीठात भिन्न आहे. २० टक्के अभ्यासक्रमाचा तर ताळमेळच बसत नाही.

२. महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांत अध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. ही विद्यापीठे तासिका तत्वावरील तासिकाधारी अध्यापकांवरच आपला अध्यापन व्यवहार रेटत आहेत. त्यामुळे क्लासरूम टिचिंग कुठल्या गुणवत्तेचे झाले असावे, याचा अंदाज घेता येईल.

३. दुसरीकडे, विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ ‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी’तच जात असल्यामुळे त्याविषयाशी पुरक अवांतर वाचन असणाऱ्या राज्यातील एकूणच विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच भरते. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कोणत्याही विषयाचे आकलन हे त्याच्या पुस्तकापलीकडे जात नाही. अशा वेळी हे विद्यार्थी सामायिक परीक्षेेला सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या कितपत तयार होतील?

४. राज्यातील सर्व विद्यापीठांची मिळून सामायिक परीक्षा घ्यायचीच तर त्या- त्या विषयाच्या सामान्य प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका संच काढावे लागतील. अभ्यासक्रमात नसलेला एकसूत्रीपणा, पुरक वाचनाअभावी विद्यार्थ्यांतील आकलन शक्तींचा अभाव यामुळे अशी सामान्य प्रश्नपत्रिका काढायचीच ठरले तर ती एखाद्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना झुकते माप देणारी तर दुसऱ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अडचणी ठरणारी म्हणजेच अन्यायकारक ठरण्याचाच जास्त धोका आहे.

५. या सर्व पार्श्वभूमीवर सामायिक परीक्षेचा प्रयोग यशस्वी कसा होणार? आणि ही परीक्षा सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना समान न्याय कसा देणार? या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सामायिक परीक्षेचा निर्णय घेण्याआधी राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाला द्यावी लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा