मीडिया मॅनेजमेंटने नव्हे महामारीचे व्यवस्थापन करून लढावी लागते कोरोनाविरुद्धची लढाई!

0
72
संग्रहित छायाचित्र.

हनोई/ नवी दिल्लीः भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा सहा हजारांच्या घरात पोहोचलेला आहे. मात्र त्याचवेळी भारतापेक्षा कमी प्रगत असलेल्या व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही आणि कोरोना बाधितांची संख्या ३२८ वरच रोखण्यात व्हिएतनामने यश मिळवले आहे. महामारीशी मुकाबला मीडिया मॅजेमेंट करून नव्हे तर महामारीचे व्यवस्थापन करूनच करावा लागतो, हे व्हिएतनामने दाखवून दिले आहे.

पावणेदहा कोटी लोकसंख्या असलेल्या व्हिएतनामची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अमेरिका आणि युरोपसारखी विकसित आणि भक्कम नाही. मध्यम उत्पन्न गटातील लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये १० हजार लोकांमागे फक्त ८ डॉक्टर आहेत. एवढ्या प्रतिकुल परिस्थितीतही व्हिएतनामने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवले. त्या यशाला कारणीभूत ठरले ते महामारीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन!

व्हिएतनामने कोरोनाच्या संकटाशी लढण्याची तयारी त्या देशात कोरोना संसर्गाचा एकही रूग्ण सापडण्याआधीपासूनच केली होती. माणसापासून माणसाला कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे दावे चीन आणि जागतिक आरोग्य संघटना करत असतानाच व्हिएतनामने कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांची प्रतीक्षा केली नाही. ठोस पावले उचलण्यासाठी देशांतर्गत आणि देशाबाहेरील आकडेवारी एकत्रित केली. जानेवारी महिन्यापासूनच वुहानमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू केली. ज्या प्रवाशांना ताप आढळला त्यांचे विलगीकरण केले, असे व्हिएतनामच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन अँड एपिडेमियॉलॉजीच्या संसर्ग नियंत्रण विभागाचे उपप्रमुख फाम क्वांग थाई यांनी सीएनएनला सांगितले. व्हिएतनामचे उपप्रधानमंत्री वू डूक दाम यांनी सीमेवरील चौक्या, विमानतळ आणि बंदरांवरच क्वारंटाइनच्या सुविधा सुरू करम्याचे आदेश दिले.

व्हिएतनाममध्ये २३ जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला संक्रमित रूग्ण आढळला. व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या एका चिनी नागरिकाला भेटण्यासाठी त्याचे वडिल वुहानहून आले होते. दोघेही पॉझिटिव्ह आढळून आले. व्हिएतनाम सरकारने दुसऱ्याच दिवशी वुहानहून येणारी सर्व विमाने रद्द केली.

भारतात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारीला आढळून आला. परंतु विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात आली. विमान उड्डाणांवर २२ मार्चनंतर निर्बंध घालण्यात आले.

जानेवारी महिन्यात व्हिएतनाममध्ये पारंपरिक नवीन वर्ष साजरे करण्यात आले. प्रधानमंत्री नग्यून शुआन फुक यांनी त्याचवेळी कोरोनाविरुद्धची लढाई घोषित करून टाकली. त्यांनी कोरोना महामारीशी लढा हा शत्रूशी लढा आहे, असे २७ जानेवारी रोजी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या विशेष बैठकीत म्हणाले. याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

भारतात २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या मोटेरो स्टेडियमवर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक लाख लोकांची गर्दी एकत्र केली होती.

१ फेब्रुवारीपर्यंत व्हिएतनाममध्ये कोरोनाचे ६ रूग्ण आढळून आल्यानंतर त्याच दिवशी सरकारने कोरोना राष्ट्रीय महामारी असल्याचे जाहीर केले. सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द केली. व्हिएतनामची राजधानी हनोईजवळ ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यावर १२ फेब्रुवारी रोजी हा भाग २० दिवसांसाठी लॉकडाऊन केला. १३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण देशात १६ कोरोना रूग्ण होते. कोरोना संसर्गाचा पहिला टप्पा येथेच थांबला.

व्हिएतनाममध्ये कोरोना संसर्गाचा दुसरा आणि अधिक धोकादायक टप्पा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आला. मात्र तोपर्यंत प्रादेशिकस्तरावर ६३, जिल्हास्तरावर ७०० साथ नियंत्रण केंद्रे, ११ हजार समूह आरोग्य केंद्रे कार्यरत झालेली होती.

एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित आढळली तर मागील १४ दिवसांत ती ज्या लोकांना भेटली, त्यांची नावे आणि पत्ते देईल, अशी व्यवस्था करण्यात आली. त्यांची नावे वृत्तपत्रात छापण्यात येत होती आणि या लोकांच्या कोणत्याही प्रकारे संपर्कात आले असाल तर नजीकच्या समूह आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्या, असे लोकांना सांगण्यात येत होते.

आरोग्य केंद्रे, रूग्णालये, लष्करी शिबिरांत क्वारंटाइन केंद्रे स्थापन करण्यात आली. जे लोक कोरोना बाधितांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आले, त्यांना विलगीकरणात टाकण्यात आले. १ मेपर्यंत सरकारी क्वारंटाइ केंद्रात ७० हजार लोकांना ठेवण्यात आले होते. कोरोनाशी संबंधित प्रत्येक छोटी छोटी माहिती लोकांना देण्यासाठी सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीची सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आली. त्यासाठी वेगळ्या वेबसाइट्स, टेलिफोन हॉटलाइन सुरू करण्यात आल्या. अॅप लाँच केले. एसएमएस सेवा सुरू केल्या.

कम्युनिस्ट पार्टीचे केडर घरोघर जाऊन लोकांना कोरोनाची माहिती देऊ लागले. लाऊडस्पिकर, पोस्टर, बॅनर, वृत्तपत्रे, चित्रपट, व्हिडीओ, ऑडिओ या सर्व माध्यमांचा वापर करण्यात आला. परिणामी गावागावातील लोकांना कोरोनाचा धोका कळला. ते जागृत झाले आणि स्वतःहोऊन पूर्णतः मोफत चाचण्या करून घेण्यासाठी पुढे आले.

भारतात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्याच्या जवळपास दोन महिन्यांनंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. तोपर्यंत संसद, विधानसभा, रेल्वे, विमानसेवा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच धडाक्यात आयोजन सुरू होते.

मध्य प्रदेशात सरकार पाडण्याचा आणि स्थापन करण्याचा खेळ सुरू होता. उत्तर प्रदेशात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने रामनवमीचा सोहळा साजरा केला. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केला.

कर्नाटकमध्ये याच काळात विशाल धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. हजारो भक्तांनी रथ ओढळा, माजी पंतप्रधानाच्या नातवाचे लग्न धुमधडाक्यात झाले, त्यात ते स्वतःही सहभागी होते.

दिल्लीत सरकारी परवानगी आणि पोलिसांच्या उपस्थितीत तबलिगी जमातीचा कार्यक्रम झाला. त्यात हजारो लोक सहभागी झाले. व्हिएतनाम आणि भारतातील कोरोनाच्या लढाईतील हा फरक आहे म्हणून दोघांच्या फलनिष्पत्तीतही मोठे अंतर आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा