मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐकाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
56

मुंबईः आज गुढीपाडवा असला तरी आपण शांत आहोत. हा गुढीपाडवा आपणाला साजरा करायचा आहेच. परंतु कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारू, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच मी घरात मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्लाही दिला.

 गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरील लाइव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. काल रात्री आपली धावपळ झाली. थोडीशी गोंधळाची परिस्थिती होती. आज निगेटिव्ह काहीही सांगायला आलो नाही. आता सर्वांना कोरोना विषाणु आणि त्याच्या गांभीर्याबाबत कल्पना आलेली आहे. आधी  त्याबाबत आपण थोडे निगेटिव्ह होतो. या संकटाची तुलना मी आधीच युद्धाशी केलेली आहे. युद्धात शत्रू कुठुन हल्ला करेल, हे जसे सांगता येत नाही तसाच हा कोरोनाचाही शत्रू आहे. म्हणून मी पहिल्यापासून आपणास सांगत आलो आहे की, घरात रहा. तुम्ही बाहेर पडला तर हा शत्रू तुमच्या घरात येईल, असे ठाकरे म्हणाले.

घरात राहण्यामुळे बऱ्याच गोष्टी सकारात्मक घडत आहेत. बऱ्याच वर्षांपासून कुटुंब एकत्र आले आहे. कुणी वाचन करत आहे. कुणी संगीत ऐकत आहे. कुणी पत्ते खेळत आहे. कुणी जुनी संगीतवाद्ये काढून वाजवत आहे. बऱ्याच वर्षांपासून आपण जे गमावलेले आहे, आज त्याची आपण हौस भागवून घेत आहोत. ही सकारात्मक गोष्ट आहे. बरेच जण मलाही विचारतात की, घरात तुम्ही नेमके काय करता? मी घरात मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोणत्याही जीवनावश्यक वस्तु किंवा सेवा आपण थांबवलेल्या नाहीत. या सर्व सेवा सुरू आहेत. जीवनावश्यक सेवेची दुकाने उघडी राहतील. तुम्ही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जाणार असाल तर एकट्या दुकट्याने जा. तेथे गर्दी करू नका. आपली, आपल्या कुटुंबाची आणि घरातील नातवंडे-ज्येष्ठ यांच्यासाठी तुम्हाला ही खबरदारी घ्यायची आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आज गुढीपाडवा असला तरी आपण शांत आहोत. गुढीपाडवा म्हटले की, हा महाराष्ट्र भगवा होऊन जातो. पण आज जरी सगळीकडे शांतता असली तरी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोतच. कोरानाच्या संकटावर मात करून, विजयाची गुढी उभारून आपण गुढीपाडवा साजरा करू या. हे युद्ध आपण जिंकणार आणि जिंकरणारच, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा