नफेखोरीचा ‘मास्टरस्ट्रोक’: आयसीएमआरला विकलेल्या रॅपिड टेस्ट किटमध्ये १४५ टक्के नफा!

0
122

नवी दिल्लीः  चीनमधून आयात करून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला ( आयसीएमआर) विकण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर नफेखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही रॅपिड टेस्ट किट चीनमधून भारतात आयात करण्याचा खर्च प्रतिकिट २४५ रुपये आहे. परंतु आयसीएमआरला ही किट  तब्बल ६०० रुपयांना विकण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल १४५ टक्के नफा कमावून आयसीएमआरला ही किट विकण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयसीएमआरने तब्बल ५ लाख रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर दिली आहे. कोरोनाच्या संकटातही हा नफेखोरीचा ‘मास्टरस्ट्रोक’ उघडकीस आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोविड-१९ रॅपिड टेस्टबाबत वितरक आणि आयातदारामध्ये खटलेबाजी झाली आणि दोघेही दिल्ली उच्च न्यायालयात गेले. या खटलेबाजीतच आयसीएमआरला विकण्यात आलेल्या या किटमध्ये मोठ्या प्रमाणावर नफेखोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चीनच्या वोंडफो आणि बायोमेडिक्स या कंपन्यांकडून तीन रुपये डॉलर किमतीच्या रॅपिड टेस्ट किट भारतात आयात करण्यात आल्या. ही किट भारतात मॅट्रिक्स लॅब या आयातदाराने आयात केल्या. भारतात आयात केलेल्या एका किटची किंमत २४५ रुपये आहे. आयसीएमआरने २७ आणि २८ मार्च रोजी ६०० रुपये प्रतिचाचणी ( जीएसटी व्यतिरिक्त) दराने पाच खाल किट खरेदीची ऑर्डर दिली. आयातदार मॅट्रिक्स लॅब्सने ही किट भारतातील वितरक रेअर मेटाबॉलिक्स लाइफ सायन्सला प्रतिचाचणी ४०० रुपये दराने या किटची विक्री केली. रेअर मटाबॉलिक्सने आयसीएमआरशी ६०० रुपये प्रतिकिट ( अधिक जीएसटी) दराने ५ लाख किट पुरवठ्याचा कॉन्ट्रॅक्ट केला. त्यापैकी २ लाख ७६ हजार रॅपिड टेस्ट किट्स आयसीएमआरला देण्यातही आल्या आहेत.

या रॅपिड टेस्ट किटची भारतातील एकमेव वितरक रेअर मेटाबॉलिक्सने  आयातदार मॅट्रिक्स लॅब्सविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नाझमी वाजिरी यांनी या किटची किंमत ३३ टक्क्यांनी घटवून प्रतिकिट ४०० रुपये दराने विकण्याचा आदेश दिला आहे. या किमतीतही वितरकाला ६१ टक्के  नफा मिळतो. तोही वाजवीपेक्षा अधिक असल्याचे न्या. वाजिरी यांनी म्हटले आहे. हे सर्व प्रकरण लोकांशी निगडित असल्यामुळे नफा कमावण्यापेक्षा लोकांना स्वस्त दरात किट्स मिळणे महत्वाचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

बिंग फुटताच आयसीएमआरने रद्द केला कंत्राटः या रॅपिड टेस्ट किटच्या खरेदी भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर आयसीएमआरने या दोन्ही कंपन्यांशी झालेले करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. चीनमधील दोन कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या किट्सचे पेमेंट देण्यात आलेले नाही, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्यात नफेखोरी होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. या भ्रष्टाचारात काहीजण सहभागी असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र २४५ रुपयांची किट ६०० रुपयांना (जीएसटी व्यतिरिक्त) घेतलीच कशी, या प्रश्नाचा उलगडा अद्याप झालेला नाही.

राहुल गांधींचा आरोपः सारा देश कोरोनाशी लढत असताना काही लोक नफेखोरी करत आहेत. या भ्रष्ट मानसिकतेबद्दल लाज वाटते आणि किळसही येते. आपले लाखो बहीणभाऊ असहाय्य यातनातून जात असातना एखादा माणूस नफा कमावू शकतो, ही बाब विश्वास आणि आकलनापलीकडची आहे. हा घोटाळा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. या नफेखोरांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी पंतप्रधानांकडे आमची मागणी आहे. देश त्यांना कधीच माफ करणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

असा झाला वादः आयातदार मॅट्रिक्स लॅब्सकडून उर्वरित २ लाख २४ हजार किट्सचा आयसीएमआरला पुरवठा केला जात नाही, असे वितरक रेअर मेटाबॉलिक्सचे म्हणणे होते. आयातदार मॅट्रिक्स लॅब्सने चीनमधून अशा ५ लाख किट्स आयात केल्या होत्या. परंतु आपणाला  २१ कोटी रुपयांपैकी ( २० कोटी रुपये अधिक जीएसटी) केवळ १२ कोटी ७५ लाख रुपयेच देण्यात आले आहेत. करारानुसार आयातदाराला आधी राहिलेले ८ कोटी २५ लाख रुपये द्या, मगच उर्वरित किट्स घ्या, असे मॅट्रिक्स लॅब्सचे म्हणणे होते. मात्र आपणाला आधी उर्वरित २ लाख २४ हजार रॅपिड टेस्टचा पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, म्हणजे करारानुसार आयसीएमआरला या किट्सचा पुरवठा करता येईल. या किट्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देण्यात येईल, असे रेअर मेटाबॉलिक्सचे म्हणणे होते. त्रपक्षीय समझोत्यानुसार भारतात अन्य कोणतीही कंपनी भारतात या किट्सचे वितरण करू शकत नाही, असा दावाही रेअर मेटाबॉलिक्सने केला. उच्च न्यायालयाने या किटची किमतच कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा