झाले गेले ते विसरून जा, आता तरी आक्रमकपणे चाचण्या वाढवाः राहुल गांधींचा मोदींना सल्ला

0
136

नवी दिल्लीः कोरोनाविरुद्ध लढण्याची आमची मुख्य शक्ती राज्य आणि जिल्हास्तरावर असून कोरोनाविरुद्धची आपला लढाई टॉप-डाऊन असून चालणार नाही तर ती बॉटम-अप असायला हवी. त्यासाठी पंतप्रधानांनी राज्यांना अधिक सशक्त बनवायला हवे. चाचण्यांच्या बाबतीत जे झाले गेले विसरून जा आणि आता तरी आक्रमकपणे चाचण्या वाढवा, असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. मोदींशी माझे अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. परंतु ही वेळ आपसात भांडण्याची नाही. आपण एक होऊन कोरोनाशी लढू, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी झूम पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. आपण मांडत असलेल्या विचारांकडे टीका म्हणून न पाहता सूचना म्हणून पाहण्यात यावे, असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले.

लॉकडाऊन हे केवळ एका पॉज बटनप्रमाणे आहे. तो काही कोरोना विषाणूवरील तोडगा नाही,हे लक्षात घ्यायला हवे. आपण जेव्हा लॉकडाऊनमधून बाहेर पडू, तेव्हा विषाणू पुन्हा सक्रीय होऊन आपले करू लागले. त्यामुळे आपल्याकडे लॉकडाऊनमधून बाहेर येण्याची रणनीती असायला हवी. लॉकडाऊन केवळ चाचण्या वाढवण्यासाठी, रूग्णालये तयार करण्यासाठी आणि व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी वेळ देतो. आपली एक चुकीची धारणा आहे. ते मी स्पष्ट करू इच्छितो. लॉकडाऊन कोणत्याही पद्धतीने विषाणूला पराभूत करू शकत नाही. लॉकडाऊन काही काळापुरता विषाणूला रोखून धरतो, असे राहुल गांधी म्हणाले.

चाचण्या हेच सर्वात मोठे शस्त्रः चाचण्या हेच विषाणूविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. चाचण्या केल्यामुळे हा विषाणू कुठे फिरतो आहे, हे माहीत करून घेऊन त्याला वेगळे करून लढता येऊ शकते. आमचा चाचण्यांचा दर एक लाखामागे १९९ आहे आणि ज्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे सरासरी प्रमाण प्रतिजिल्हा केवळ ३५० आहे. त्यामुळे आक्रमक पद्धतीने चाचण्या वाढवा. जास्तीत जास्त चाचण्या करा आणि रणनीती म्हणून त्यांचा वापर करा. आपल्या लढाईत राज्यांच्या मदतीसाठी चाचण्यांचा वापर करा. केवळ रुग्णांचा शोध घेण्यासाठी नव्हे तर विषाणूचा शोध घेण्यासाठी चाचण्या करा, असा माझा सरकारला सल्ला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

जे झाले गेले ते विसरून जाः चाचण्यांच्या बाबतीत आतापर्यंत जे काही झाले आहे, ते होऊन गेले आहे. ते विसरून जा. परंतु आता आम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये आहोत. त्यामुळे आपण आता सर्व भारत मिळून कोरोनाविरुद्ध लढू. कमकुवत पद्धतींचा अवलंब न करता एक निश्चित रणनीती घेऊन काम करावे लागेल. लॉकडाऊनमुळे आपले काम संपले, असे नाही तर परिस्थिती पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यांना जीएसटी द्या. राज्यांशी चर्चा करा. याच दिशेने जाण्याची आता गरज आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने राज्यांना पैसा पोहोचायला हवा होता, ते होताना दिसत नाही. कोरोनाशी वैद्यकीय आणि आर्थिक अशा दोन आघाड्यांवर युद्ध सुरू आहे, असे राहुल म्हणाले.

गरिबांना जेवण, थेट पैसे द्याः गोदामांमध्ये अन्नधान्य पडले आहे. गरिबांना जेवण द्या. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही, त्यांचाही समावेश करा. अन्न सुरक्षेचा एक मार्ग निश्चित करा. गोदामांमध्ये ठेवलेले अन्न लोकांपर्यंत पोहोचत नाही, याचे मला दुःख आहे. न्याय योजनेप्रमाणेच गरिबांनाही थेट पैसे द्या. कारण गरिबांनाच अडचणी येत आहेत आणि येणारही आहेत. हवे तर न्याय योजनेच्या जागी अन्य काही नाव ठेवा, असा सल्लाही राहुल यांनी दिला.

बेरोजगारीचे विक्राळ रूपः बेरोजगारी सुरू झाली आहे. बेरोजगारीचे भयंकर वाईट रूप समोर येणार आहे. रोजगार देणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. मोठ्या कंपन्यांसाठी पॅकेज तयार करा. लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्यासाठी काय केले जात आहे, हे कळायला हवे होते, असे राहुल म्हणाले.

कृतीत विलंब नकोः लॉकडाऊनंतरच्या रणनीतीवरही लक्ष देणे आवश्यक आहे. चाचण्या, मेडिकलचे धोरण काय असेल? प्राथमिक आरोग्य केंद्रे, रूग्णालये कसे तयार करणार? कारण लॉकडाऊननंतर आजार वाढेल. त्यामुळे कृतीमध्ये विलंब होता कामा नये, असे राहुल यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा