देशात २४ तासांत कोरोनाचे नवीन ३,५२५ रुग्ण, १२२ मृत्यू

0
73
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ३ हजार ५२५ नवे रूग्ण आढळून आले असून १२२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजपर्यंत देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ७४ हजारावर गेली आहे तर मृतांचा आकडा २ हजार ४१५ वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गाचे देश आणि जगभरातील हे लेटेस्ट अपडेट्स…

देशः देशातील कोरोना बाधितांचा आकडा पाऊण लाखांवर पोहोचला. त्यापैकी २४ हजार ३८६ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ४७ हजार कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा २४ हजारांवर गेला आहे तर मृतांची संख्या ९२१ झाली आहे. गुजरातमध्ये ८ हजार ९०३ कोरोना बाधित रूग्ण आहेत. तेथे ५३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये ७ हजार ६३९ कोरोना बाधित रूग्ण झाले असून ८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ८ हजार ७१८  आणि मृतांची संख्या ६१ झाली आहे.

दुनियाः जगभरात आतापर्यंत ४३ लाख ३७ हजार कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या जगभरातील रूग्णांची संख्या १६ लाखांवर आहे. अमेरिकेत १४ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ८३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एकूण कोरोना बाधितांपैकी २ लाख ९६ हजार रूग्ण बरे झाले आहेत. तेथे अद्यापही १० लाख कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. स्पेनमध्ये कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या २ लाख ६९ हजार झाली आहे. २६ हजार स्पॅनिश लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रशियात २ लाख ३२ हजार कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून २ हजार ११६ लोकांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये २ लाख २६ हजार कोरोना संक्रमितांपैकी ३२ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. इटलीतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २ लाख २१ हजार झाला आहे. तेथे ३१ हजार लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत.

लस निर्मितीः कोरोनाच्या संसर्गावरील लस निर्मितीचा शोध अंतिम टप्प्यात आला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. सध्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. मात्र ही लस बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करून कोरोना सोबत जगण्याची सवय घालून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा