देशातच प्रचंड तुटवडा, तरीही भारताने सर्बियाला दिली ९० टन संरक्षणात्मक वैद्यकीय उपकरणे

1
276
छायाचित्र सौजन्यः यूएनडीपी.

नवी दिल्लीः भारतात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक संरक्षण किट उपलब्ध होत नाही. देशात कोरोना संरक्षण किटचा प्रचंड तुटवडा असतानाच भारताने सर्बियाला तब्बल ९० टन वैदयकीय उपकरणे आणि संरक्षण किट निर्यात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्बियातील संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाने ( यूएनडीपी) केलेल्या ट्विटमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कानावर आपणाला याबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.

‘ ९० टन वैद्यकीय संरक्षण उपकरणांसह दुसरे कार्गो बोइंग ७४७ भारतातून आज ब्रेलग्रेडला पोहोचले. हा अमूल्य पुरवठा सर्बिया सरकारने संयुक्त अरब अमिरातीने दिलेल्या निधीतून खरेदी केला आहे. यूएनडीपी सर्बियाने शक्य तितक्या लवकर डिलिव्हरी व्हावी म्हणून विमानाची व्यवस्था केली आहे,’ असे ट्विट यूएनडीपीने केले आहे.

भारताने सर्बियाला निर्यात केलेल्या या ९० टन संरक्षणात्मक वैद्यकीय उपकरणांमध्ये ५० टन सर्जिकल ग्लोव्हज आणि कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना अत्यंत निकडीचे असलेले मास्क आणि कव्हरॉलचा समावेश असल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. निर्जतूंक सर्जिकल ग्लोव्हजच्या ३५ लाख पेअरचा समावेश असलेली दुसरी खेप २९ मार्च रोजी बेलग्रेडला पाठवण्यात आल्याची माहितीही कोची विमानतळाच्या प्रवक्त्याने एनडीटीव्हीला दिली. हा ३० टन माल ट्रान्सएव्हियाएक्सपोर्ट एअरलाइन्सच्या विमानाने बेलग्रेडला पाठवण्यात आला.

भारतात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षणात्मक वैद्यकीय उपकरणांचा प्रचंड तुटवडा भासत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे देशभरात सुमारे १०० डॉक्टर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अनेकांना कोरोना विषाणूची बाधाही झाली आहे. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा (पीपीई) तुटवडा असल्यामुळे त्यांचे जीव धोक्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमधील बेलियाघाट संसर्गजन्यरोग रूग्णालयातात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई नसल्यामुळे प्लास्टिकचे रेनकोट देण्यात आल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा स्थितीत भारतातील डॉक्टरांना पीपीई उपलब्ध करून देण्याऐवजी भारत सरकार परदेशात त्यांची निर्यात करत आहे. त्यामुळे भारत सरकार कोरोना संकटाशी लढण्यात किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप होत आहे.

एक प्रतिक्रिया

  1. भारतीय म्हणून ही बाब मला चुकीची वाटते, देशातील लोकांच्या जीवीताचे पहिल्यांदा रक्षण करणे अपेक्षित आहे, कोरोनावर सुद्धा आम्ही हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई म्हणून वाद करत आहोत. आमच्या जिवीताशी खेळत नफेखोर नफा कमावण्यात मग्न आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा