धन्यवाद आरोग्य यंत्रणा !

1
45

कोरोना हे अचानकच संकट आहे पण जी संकटे नियमित येत असतात त्यांसाठी तरी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे का? जे लोक आज या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करत आहेत, ते त्यांच्या सर्व क्षमता वापरुन, प्रसंगी स्वत:च्या आरोग्याकडे, स्वत:च्या मानसिक स्वास्थ्यांकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन दिवसरात्र खपत आहेत. हा त्यांच्या जगण्याच्या हक्कावरच घाला आहे. आपल्याकडे आलेला रुग्ण बरा झाला की डॉक्टर्स व इतर सर्व स्टापला आनंद होतोच, पण जर तो दगावला तर याच डॉक्टर्स व नर्स आदी स्टापचे संवेदनशील हृदय पिळवटून निघते. पण देश म्हणून आमच्या हृदयात त्यांच्याप्रती काय भाव आहे?

संदीप बंधुराज

अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीच्या आधारे प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देणाऱ्या माझ्या सर्व आरोग्य कर्मचारी बांधव आणि भगिनींचे आभार! यात कायम व कंत्राटी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, स्वीपर, आरोग्यसेवक, आरोग्य निरिक्षक, चालक सर्व सर्व आले! त्या सर्वांचे आभारच! 

प्रगत देशात बजेटमध्ये संरक्षणापाठोपाठ आरोग्य व शिक्षण यांकडे लक्ष दिले जाते. मात्र भारतात संरक्षणावर ११ टक्के लक्ष आहे तर आरोग्य यंत्रणेकडे केवळ २.२६ टक्केच लक्ष आहे असे म्हणावे लागेल. कारण देशाच्या एकूण बजेटच्या केवळ २.२६% एवढाच निधी आरोग्यासाठी असतो. हे आजचेच नाही तर सुरुवातीपासूनचेच आहे. कॅगच्या अहवालानुसार आरोग्यावरील खर्च जीडीपीच्या १.१ टक्के एवढाच केला जातो. त्यातही ६३% प्रशासकीय बाबींवर; खर्च होतो. वैद्यकीय उपकणांरांची कमतरता २७.२१ टक्के आहे. तर अवैद्यकीय उपकरणे ( ऑक्सिजन वगैरे ) ५६.३३ % कमतरता आहे.  अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे पाच वर्षांच्यावर वापरण्याजोगी उरत नाहीत. कारण त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पैसाच नसतो.  ‘१३० करोड’ नागरfकांसाठी केवळ १० लाख डॉक्टर्स आहेत. त्यातीलही केवळ १० टक्केच सरकारी दवाखान्यात आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील ‘९० करोड’ लोकांसाठी केवळ १ लाख डॉक्टर्स आहेत. अनेक कंत्राटी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. नर्स व इतर स्टापचे हाल तर विचारायलाच नको. इमारतींची स्थिती कशी आहे हेही ठाऊक आहेच. याशिवाय डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत. औषधे आहेत पण डॉक्टर्स नाहीत, अशी अवस्था असल्याने ५१ टक्के लोकांवर परवडत नसले तरी खासगी दवाखान्यात जाण्याची पाळी येत आहे. शिवाय जे लोक सरकारी दवाखान्यांत येतात त्यांचा व त्यांच्या राजकीय गुंडीय दादा-भाईं-ताईंचा प्रचंड दबाव डॉक्टर्स व इतर सर्व स्टापवर असतो, हेही लक्षात घेता या सर्व ‘प्रचंड भयानक’ परिस्थितीत सेवा देणाऱ्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानायलाच हवेत. कोरोनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही संधी उपलब्ध करुन दिली खरी, पण केवळ तेवढयाने ‘राजा खुश झाला आणि हाती भोपळा दिला’ (घंटा दिली असेही म्हणता येईल ) यापलीकडे काही साध्य होणार नाही.

आज कोरोनाचे निमित्त साधून आरोग्य यंत्रणेचे आभार मानण्याचा उत्सव साजरा केला गेला. पण या यंत्रणेसाठी पुरक वातावरण निर्माण केले गेले पाहिजे. देशात आरोग्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले पाहिजे. आरोग्य व आरोग्यसेवा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नागरिकांना चांगले आरोग्य लाभावे असे वातावरण तयार करणे व जर आरोग्य बिघडले तर त्यांना वेळीच चांगली सेवा देणे अशा या दोन गोष्टी आहेत. पण या देशातील आतापर्यंतची सर्वच सरकारे या दोहोंतही अपयशी झालेली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही नवीन संशोधन नाही वा रुग्णालयांचे अत्याधुनिकरण नाही. कोरोना हे अचानकच संकट आहे पण जी संकटे नियमित येत असतात त्यांसाठी तरी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे का? जे लोक आज या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करत आहेत, ते त्यांच्या सर्व क्षमता वापरुन, प्रसंगी स्वत:च्या आरोग्याकडे, स्वत:च्या मानसिक स्वास्थ्यांकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन दिवसरात्र खपत आहेत. हा त्यांच्या जगण्याच्या हक्कावरच घाला आहे. आपल्याकडे आलेला रुग्ण बरा झाला की डॉक्टर्स व इतर सर्व स्टापला आनंद होतोच, पण जर तो दगावला तर याच डॉक्टर्स व नर्स आदी स्टापचे संवेदनशील हृदय पिळवटून निघते. पण देश म्हणून आमच्या हृदयात त्यांच्याप्रती काय भाव आहे?

कोरोनाच्या निमित्ताने त्यांचे आभार मानून न थांबता  त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी सरकारने जर पावले उचलली, नागरिकांसाठी सेवा देण्यासाठी त्यांना साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन दिली तरच त्यांचे खरे आभार मानल्यासारखे होईल…बाकी टाळया वाजवणे, थाळ्या वाजवणे व घंटा वाजवणे हे केवळ प्रोत्साहन देण्यापुरते ठीक आहे. उपाशीपोटी प्रोत्साहन खूपकाळ काम करत नाही. भूकेपोटी न होई जनसेवा, जाणून घ्यावे सकळ जन।।

 केवळ भाषणाने किंवा प्रोत्साहनाने लढाई जिंकता येत नाही. त्यामुळे सैनिक सज्ज होतीलही पण लढाई जिंकण्यासाठी लागते योग्य व पुरेशी साधनसामुग्री आणि आर्थिक बळ!  या यंत्रणेसाठी सरकार आर्थिकबळाच्या टाळ्या, थाळ्या आणि घंटा कधी वाजवणार आहे?

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा