भारतीय सैन्य कोरोना युद्धासाठी तयारः कमांड हॉस्पिटल, आयसीयू, वैद्यकीय पथके सज्ज

0
176
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतीय लष्कराने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणापलिकडे पसरल्याच्या स्थितीत उपचार आणि अन्य बाबतीत नागरी प्रशासन आणि स्थानिक सरकारांना हवी ती मदत देण्याचा कृती आराखडा तयार केला असून कोरोनाशी युद्ध लढण्यासाठी आपत्कालीन तयारी पूर्ण केली आहे. सरकारने सांगितल्यास गरजेनुसार तत्काळ सेवा उपलब्ध करण्यासाठी तयार रहावे म्हणून भारतीय लष्कराने ही तयारी करून ठेवली आहे.

लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरावणे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा संपूर्ण कृती आराखडा विस्ताराने सांगितला आहे. स्थानिक नागरी प्रशासनाच्या सांगण्यानुसार वैद्यकीय सेवासुविधा आणि उपकरणे वगैरे उपलब्ध करून दिली जातील. कोणत्याही क्षणी ही स्थिती उदभवू शकते असे गृहित धरून सज्ज राहण्याचे आदेश सर्व कमांड हॉस्पिटल्सना देण्यात आले आहेत. कमांड हॉस्पिटलमधील आरोग्यसुविधा आतापासूनच वाढवून सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असे जनरल नरावणे यांनी सांगितले.

भारतीय सैन्याची मुख्य तयारी अशीः मुख्य रूग्णालय, कमांड हॉस्पिटल आणि शाखा रूग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.आवश्यकता पडल्यास सहा तासांच्या आत ४५ बेडची रुग्णालये उभारता येतील, यादृष्टीने तयारी करून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व कमांड हॉस्पिटल्सना १० बेडचे आयसीयू उभारणीसाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लष्कराची ३० टक्के फिल्ड हॉस्पिटल्स कोरोनाबाधितांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन स्थितीत तैनात करता यावीत म्हणून लष्कराची धडक प्रतिसाद वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक कमांड एरियासाठी स्वतंत्र हेल्पलाइन बनवण्यात आली आहे.

क्वारंटाइन केंद्रेः भारतीय लष्कराने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याआधीही काही काम केले आहे. दिल्लीजवळील मनेसर, राजस्थानमधील जैसलमेरआणि जोधपूरमध्ये विशेष क्वारंटाइन केंद्रे स्थापन केली आहेत. येथे चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या कोरोनाबाधित लोकांना ठेवण्यात आले आहे. मनेसरमध्ये ३७२ लोकांना क्वारंटाइन करून त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. सध्या या केंद्रात ८२ लोक आहेत. जैसलमेरमध्ये ४८४ आणि जोधपूरमध्ये २७७ लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. हे लोक इराणहून आणलेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा