खरिपासाठी आवश्यक साधनसामुग्री पुरवठ्याची परवानगी द्याः उद्योगांची राज्य सरकारकडे मागणी

0
27
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम तोंडावर आला असून त्यासाठी लागणारी शेती अवजारे, किटकनाशके, खते, कृषिपंप यांचा पुरवठा करण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्यातील उद्योगांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज अर्थात सीआयआयच्या वतीने विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्री यांच्या व्हिडिओ कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. संरक्षण दलास लागणाऱ्या साधनांचे उत्पादन, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवास आणि निर्यातीचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी उद्योग समूहांच्या प्रमुखांनी उद्योगमंत्र्यांकडे केली. या सर्व मागण्यांचा विचार करून त्यावर मार्ग काढण्याची ग्वाही देसाई यांनी दिली.

कोरोना संकटानंतर उद्योग क्षेत्रापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. याकामी राज्य सरकार उद्योजकांसोबत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे महाराष्ट्राचे संचालक अरविंद गोयल,  गोदरेज, एल ॲन्ड टी, के.ई.सी. पॉलिकॅब, सॅमी हेवी इंडस्ट्रीज, जॉन्सन कंट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन व महिंद्रा आदी नामांकित कंपन्यांसह इतर कंपन्यांचे १७०  हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा