पुढील आठवड्यापासून राज्यात आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू होणार, मंत्री विजय वडेट्टीवारांचे संकेत

0
962
संग्रहित छायाचित्र.

गडचिरोलीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यापासून बंद असलेली एस बससेवा पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांच्या हस्ते आज चंद्रपूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा  झाली. आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्य सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे. ज्या अटी-शर्तींच्या अधीन राहून जिम सुरू होतील, तशाच अटी-शर्ती घालून राज्यातील कोचिंग क्लासेसही सुरू करण्याची परवानगी देण्याबाबतचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरजिल्हा बससेवा बंद असल्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकनास तर झालेच शिवाय बसेस बंद असल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींच्या वेळीही अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी वाहनाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे.

मार्च महिन्यापासून राज्यातील एसटीची बससेवा बंद आहे. अत्यावश्यक सेवेसाठी काही मोजक्याच बसेस वापरण्यात आल्या आहेत. उर्वरित बसेस मार्च महिन्यापासून बसडेपोतच उभ्या आहेत. त्यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला असून कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांधे झाले आहेत. आता आंतरजिल्हा बससेवा सुरू होण्याचे संकेत मिळाल्यामुळे एसटीची थांबलेली चाके पुन्हा गतीमान होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा