ज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार?

2
194
संग्रहित छायाचित्र.

इवांकाच्या या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, त्यांना सुंदर भासलेल्या या चित्राचे समाज माध्यमांवरील भारतीय लोक गुणगाण करत आहेत. खरेतर ही मंडळी एकतर शातीर आहेत किंवा बधीर आहेत. या मनोदशेच्या दोन्ही भारतीय लोकांकडून अनुक्रमे तिच्या व्यथा दडपण्याचा, व्यवस्थेची लक्तरे झाकण्याचा जाणून बुजून प्रयत्न होत आहे. तर काहीजण व्यवस्थेने बधीर केलेल्या मनाने ज्योतीच्या बहादुरीचे कौतुक करत व्यक्त होताना दिसत आहेत. या दरम्यान व्यवस्थेने कोवळ्या वयात तिच्या मनावर ओढलेले वेदनादायी ओरखडे मात्र यांना ना दिसले, ना ऐकायला आले. टाळेबंदी करताना आणि तिचा प्रवास संपून घरी जाईपर्यंत तिच्या व्यथा कुणाही मायबाप सरकारला ऐकायला आल्या नाहीत. हा बधीरपणा नाही काय?

आर.एस. खनके, पुणे

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांनी चार दिवसांपूर्वी,२२ मे रोजी ज्योतिकुमारी या भारतीय कन्येच्या धारिष्ट्याबाबत देशी बातमीसह दोन परिच्छेदाचो एक ट्वीट केल्याने भारतातील रस्त्यावर आलेल्या गोरगरीब मजुरांची कैफ़ियत जगाच्या पटलावर चर्चेला आली. १५ वर्षे वयाच्या आठव्या वर्गात शिकणाऱ्या ज्योतिकुमारी या मुलीने आपल्या वडिलांना सायकलवरून सलग ७ दिवस १२०० किलो मीटरचा प्रवास करून आपल्या गावी सुखरुप परत आणल्याबाबत इवांका यांनी ट्वीट केले आहे. त्यासोबत जे चित्र जोडले आहे त्यात एका निर्जन डांबरी रस्त्यावरून भर उन्हात ज्योतिकुमारी आपल्या वडिलांना सायकलच्या कॅरियरवर बसवून सायकलस्वारी करत आहे. वडिलांजवळ जरूरी बिऱ्हाडाचं ओझं आहे. दोघांच्या ओझ्यासह ही किशोरवयीन ज्योतिकुमारी मोठ्या परिश्रमाने सायकल चालवत आहे, असे हे चित्र आहे.

इंवाका ट्रम्प ट्विटमधल्या पुढच्या परिच्छेदातील ओळी या चित्राला सुंदर दृष्य संबोधून भारतीयांनी याची दखल घेतली असे त्या म्हणतात. इवांकाच्या या ट्विटकडे भारतीय लोक कौतुकाने बघत आहेत. ज्योतीची दखल एका जागन्मान्य व्यक्तीने घेतली याचे त्यांना अप्रूप आहे. त्यांच्या नजरेतून हे दृष्य फार चांगले आहे. इवांकाच्या या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, त्यांना सुंदर भासलेल्या या चित्राचे समाज माध्यमांवरील भारतीय लोक गुणगाण करत आहेत. खरेतर ही मंडळी एकतर शातीर आहेत किंवा बधीर आहेत. या मनोदशेच्या दोन्ही भारतीय लोकांकडून अनुक्रमे तिच्या व्यथा दडपण्याचा, व्यवस्थेची लक्तरे झाकण्याचा जाणून बुजून प्रयत्न होत आहे. तर काहीजण व्यवस्थेने बधीर केलेल्या मनाने ज्योतीच्या बहादुरीचे कौतुक करत समाज माध्यमांवर व्यक्त होताना दिसत आहेत. या दरम्यान व्यवस्थेने कोवळ्या वयात तिच्या मनावर ओढलेले वेदनादायी ओरखडे मात्र यांना ना दिसले, ना ऐकायला आले. टाळेबंदी करताना आणि तिचा प्रवास संपून घरी जाईपर्यंत तिच्या व्यथा कुणाही मायबाप सरकारला ऐकायला आल्या नाहीत. हा बधीरपणा नाही काय?

वायरने याबाबत सर्वप्रथम सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. तीच बातमी टाइम्स ग्रुपवर आली. इवांका यांनी त्या बातमीवरून आपले ट्विट केलेले आहे. ज्योतिकुमारीची चिकाटी, साहस आणि परिश्रमाची दखल घेवून भारतीय सयकलिंग फ़ेडरेशनचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी ज्योतिकुमारीला नॅशनल सायकलिंग ॲकॅडमीमध्ये प्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे. सिंह यांनी तिची जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची वृत्ती यासारखे अंगभूत गुण पाहून संधी देण्याबाबतचा मानस एका वृत्तसंस्थेला बोलून दाखवला. त्यासाठी ज्योतिकुमारीला आवश्यक चाचणी द्यावी लागेल. फ़ेडरेशनची ही भूमिका पाहून कुणालाही आनंद वाटेल अशी ही बातमी आहे. यातून तिच्या आयुष्याला नवी दिशा लाभू शकते. या बातमीबरोबरच समाज माध्यमांतून अनेकांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. ते करायलाही हवेच. पण याही पुढे समाज म्हणून बघण्याची गरज आहे.

कौतुकाने ज्योतीला प्रसिद्धी मिळेल. सायकल फेडरेशनमुळे तिला काही संधीही मिळतील. पण तिच्या कष्टाच्या महिमामंडणात लाखो ज्योतींच्या हालअपेष्टा दबल्या जाणार नाहीत, एवढ्या डोळस दृष्टीचा आणि वेदना ऐकायला येण्याच्या श्रवणशक्तीचा पल्ला आमचा समाज कधी गाठणार?  हा खरा पीडादायक प्रश्न आहे. प्रवास करू आपल्या घरी पोचलेल्या ज्योतीला पत्रकार बरखा दत्त यांनी जेव्हा तुझ्यावर ही आपत्तीची वेळ आली त्याची तुला चीड नाही का येत? असा प्रश्न विचारला तेव्हा ज्योतीने ‘चीढ बहूत आती हैं मगर क्या करें’ असे असहायपणे दिलेले उत्तर समाज म्हणून आम्हाला ऐकता आले पाहिजे.

 ज्योतिकुमारीचे मूळ गाव सिरुहुली. बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातलं. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिचे वडील मोहन पासवान यांनी गाव सोडलेलं. उपजीविकेच्या शोधात दिल्लीजवळच्या गुड्गावमध्ये रहायला गेले. तिथे ते एका व्यक्तीच्या खाजगी मालकीची ऑटोरिक्षा भाडेतत्वावर चालवत होते. दिवसभर रीक्षा चालवून रोज मिळणाऱ्या पैशातून प्रथम रीक्षा मालकाचं ठरलेलं देणं देवून राहिलेली शिल्लक रक्कम ती आपली रोजची कमाई. त्यावर आपली गुजरान चालवणं हा त्यांच्या उपजिविकेचा नित्याचा मार्ग. सोबत कुटुंबाचं बिऱ्हाड पोसता येत नाही म्हणून बायको आणि इतर मुलं गावाकडेच राहिलेली. सोबत केवळ एकटी ज्योतिकुमारी. अशा स्थितीत भाकर तुकड्यासाठी सोडून आलेल्या गावाकडच्या घरातून काळजाचा तुकडा हाक देत होता.

पायाला झालेला अपघात, देशात जाहीर झालेली टाळेबंदी यामुळे मोहन यांनी रीक्षा मालकाकडे परत केला. त्यांचा रोजगार संपुष्टात आला. उपासमार सुरू झाली. टाळेबंदीचे दिवस केव्हा संपतील याचा अंदाज बांधणं कठीण झालेलं. अशा स्थितीत ‘गड्या आपला गांव बरा’ असं मनात आल्यानं त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासासाठी रस्त्यावर वाहन नाही हे एक मोठं संकट अशा मजुरांपुढे आ वासून उभे ठाकलेले.

 अशा स्थितीत मोहन आणि ज्योतिकुमारी या बाप लेकीनं सायकलवरून गाव गाठण्याचा निर्धार केला. त्यासाठी सोबत असलेल्या पैशातून एक जुनी सायकल खरेदी केली. काही दिवसांपूर्वी मोहन यांच्या पायाला एका अपघातात मार लागलेला असल्याने त्यांना सायकल चालवता येणंही कठीण. अशा स्थितीत ‘लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका, सायकलच्या मागे बसा मी तुम्हाला गावी घेवून जाते.’ म्हणत ज्योतीने प्रवासाला आरंभ केला. १० मे रोजी गुडगाववरून पायडल मारून तिने सुरुवात केलेला प्रवास १६ मे रोजी आपल्या गावी पोचल्यानंतर संपला. तब्बल १२०० किलो मीटर एवढं अंतर केवळ सायकलवरून कापून आपल्या वडिलांना सुखरुप आपल्या कुटुंबात आणण्याची किमया ज्योतीने केली. रस्त्यात माणुसकी असलेल्या लोकांनी त्यांना अन्नपाणी दिले. त्यातून प्रवास काही प्रमाणात सह्य झाला.त्याबद्दल ती कृतज्ञ आहे. आपल्या सायकल प्रवासात रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या आश्रयाने त्यांनी रात्री काढल्या.

आज समाजमाध्यमांतून ज्योती कुमारीने दाखवलेल्या शौर्यामुळे तिचे कौतुक होताना दिसत आहे. हे वरकरणी चांगले दिसत असले तरी तिच्यावर आलेली वेळ पाठीशी घालता येत नाही. किंबहुना तिच्या साहसाच्या कौतुकात आपल्या व्यवस्थेच्या दरिद्रीपणाकडे दुर्लक्ष करता येत नाही. गरिबीचे महिमामंडण करून इथले प्रश्न सुटत नाहीत. १२०० किलोमीटरचा प्रवास करताना चार राज्यातून हा प्रवास झाला पण व्यवस्थेला त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याचे कुणालाच काहीही सोयरसुतक वाटले नाही.

इवांकासारख्या श्रीमंतीत लोळलेल्या व्यक्तींना आणि समाजाला ज्योतीचे रस्त्यावरील सायकल चालवतानाचे चित्र सुंदर वाटते. अनेकांना अशी गरिबीची चित्र शौक म्हणून आपल्या दिवाणखान्यात भिंतीची शोभा वाढवणारी वाटतात. ते भिंतीवर लटकवण्यात अनेक धनिक रसिकांना धन्यता वाटत असते. त्यांना दारिद्र्याचेही महिमामंडण करण्यात आनंद मिळत असतो. ही सर्व मंडळी परदु:ख शीतल या भावविश्वातले असतात. यांचे जग वेगळे असते. इवांकाला या दृष्यात  तिच्या व्यथा दिसल्या नाहीत. तिला मदत करावीशी वाटली नाही. तिच्या असाहयतेला कारण ठरलेल्या व्यवस्थेला सुनावण्याबाबत काहीही सूचले नाही. त्याचे कारण व्यवस्थेच्या अशा चित्रात त्यांना कुरुपते ऐवजी सुंदरता दिसते. हा दृष्टिकोनाचा परिणाम आहे.

 ज्योतीच्या चित्राकडे माणूस म्हणून बघायला व्यक्ती मातृहृदयी असायला लागते. कुठल्याही आईला हे चित्र सुंदर दिसत नाही. ते वेदनादायी आणि काळीज पिळवटून टाकणारे वाटते. आपल्या लेकरावर आलेली आपत्ती पाहून अंत:करण कासावीस होते. ज्योतीचे सायकलवरील कष्टदायक चित्र तिच्या आईला कधीही आंददायी वाटू शकत नाही. ज्योतीच्या आईलाच काय तर कुठल्याच आईला आपल्या लेकरावर आपत्तीने ओढवलेले असे कष्ट्दायक चित्र सुंदर वाटत नाही.

 काही वर्षांपूर्वी एका मराठी साहित्यिकाच्या अशाच कौतुकाच्या ओळी वाचण्यात आल्या होत्या. त्यात तो म्हणतो, ‘मला नदीकाठच्या हिरव्या कुरणात म्हशीच्या पाठीवर बसून गवळ्याच्या पोर जेव्हा बासरी वाजवतना दिसते, ते दृष्य पाहून मला अतिशय आनंद होतो.’ तसेच हे इवांकाचेही ट्विट. या मराठी साहित्यिक महाशयाला अशा सुंदर दृष्यात स्वत:चे पोर म्हशीच्या पाठीवर बसलेले बघायला का आवडले नसावे? जर खरेच त्यांना अशा दृष्यातून परमानंद मिळत असेल तर आपली लेकरं त्यात कुशल झाली तर आयुष्यभरासाठी आनंदाचा झरा नसता का मिळाला?

इवांकाला आणि या साहित्यिकाला आनंद मिळण्यासाठी ज्योतीची सायकल आणि गवळ्याचे पोर वेदनेतच चांगली वाटतात. वेदनेच्या महिमामंडणात ज्योती आणि गवळ्याच्या पोराची दुर्दशा जाणवू नये यासाठीची ती एक मोठी मानसिक भूल असते. आहेरे वर्गाची ही निबिड समाज व्यवस्था असते. जी वेदनेचेही भांडवल करून आपले आयुष्य रसिक बनवण्याचा प्रयत्न करत असते.

इवांकाने केलेले हे ट्विट आणि त्यातले चित्र भारतीय सामाजिक-आर्थिक आणि एकूणच इथल्या व्यवस्थेच्या मनोदशेचे अस्सल चरित्र आहे. ज्योती आणि ज्योतीचे वास्तव हे आजच्या भारतातील समग्र निर्वासित कामगारांचे आणि आमच्या बधीर व्यवस्थेचे वास्तव आहे. धनिकांनी विदेशातून आणलेला कोरोनाचा आजार आमच्या व्यवस्थेने आज गरिबांच्या वस्तीत आणून ठेवल्याने त्या वस्तीतूनही त्यांना निर्ममपणे पिटाळून लावत आहे.

2 प्रतिक्रिया

  1. Evanka trumph यांनी ट्विट करण्याची वेळ आपल्यावर यावी हे दुर्दैव आहे. विमानाने श्रीमंतांना घरी पोहचवले. गरीब लोकांना

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा