‘दिवे लावा, प्रकाश पाडा आणि सरकारकडून चुकूनही अपेक्षा ठेवू नका’

0
393

मुंबईः सबंध देश कोरोनाच्या संकटामुळे दहशतीखाली असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे देशातील १३० कोटी लोकांना येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे पेटवण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. मोदींनी देशवासियांना केलेले हे आवाहन म्हणजे ‘दिवे लावा, प्रकाश पाडा, सरकारकडून चुकूनही अपेक्षा ठेवू नका’ अशाच धाटणीचे असल्याचे शरसंधान मोदींवर केले जाऊ लागले आहे.

मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशातील नागरिकांसाठी व्हिडीओ संदेश जारी केला. या संदेशातून ते देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजनांची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी देशावरील कोरोनाच्या संकटाची नेमकी स्थिती काय आहे, हे संकट निस्तरण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, कोणत्या करणार आहे याबाबत चकार शब्दही सांगितला नाही. केवळ ५एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावून महाशक्ती दाखवून द्या, असे आवाहन केले. मोदींच्या या व्हिडीओ संदेशाची सार्वत्रिक खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.

भारताने कोरोनाची लस शोधली. एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. गरीब उपाशी झोपणार नाही, असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते.पण त्यांनी संकटाचाही इव्हेंट करायचे ठरवले. म्हणे अंधार करा आणि बॅटरी लावा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका.जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मुर्खपणा आहे. मी मुर्ख नाही. मी त्या दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातील दिवे बंद करणार नाही, असे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनाला कडाडून विरोध केला आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही दोन ट्विट करून मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. प्रधान शोमनला ऐकले. लोकांचा त्रास, त्यांच्यावरील तणाव, त्यांच्या आर्थिक विवंचना कशा कमी होतील याबाबत त्यात काहीही नाही. लॉकडाऊननंतर त्यांनी काय करायचे ठरवले याबाबतही काही नाही की भविष्यातील कोणती योजना नाही. भारताच्या फोटो-ऑप पंतप्रधांनानी केवळ फीलगुड क्षण निर्माण केला आहे, असे थरूर यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर हा काही अपघात नव्हेः पंतप्रधानांनी रामनवमीच्या दिवशी सकाळी ९ वाजता ९ मिनिटे भाषण दिले आणि ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे पेटवायला सांगितले. ते हिंदू धर्मातील सर्व शुभ घटकांना ९ नंबरशी जोडत आहेत. म्हणजे पुन्हा राम भरोसे? , असे दुसरे ट्विट त्यांनी केले आहे.

सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदींच्या भाषणाने देशवासियांच्या हाती घोर निराशाच आली. वाटले होते चुल पेटवायला सांगतील, पण साहेब तर दिवे पेटवायचा उपदेश देऊन गेले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

तर थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालये, व्हेंटिलेटर, चाचणी केंद्रांचा गरज आहे. हातावर पोट असलेल्यांना दोन वेळचे जेवण हवे आहे. त्यामुळे मोदी सरकारने हे प्रसिद्धी स्टंट बंद करून ठोस पावले उचलावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा