मद्यविक्रीला मुभाः सोमवारपासून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील वाइन शॉप्स उघडणार, अटी लागू

0
3130
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊन-३ मध्ये देशभरातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमधील मद्यविक्रीची दुकाने सोमावारपासून उघडणार आहेत. त्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेत हा खुलासा करण्यात आला आहे. मात्र कंटेनमेंट झोनमधील मद्यविक्रीची दुकाने बंदच रहाणार आहेत.

देशभरातील तिन्ही झोनमध्ये एकाकी असलेली ( स्टँड अलोन) मद्यविक्रीची दुकानेच सोमवारपासून उघडली जातील. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्समधील मद्यविक्रीची दुकाने आणि पानटपऱ्या बंदच रहातील. केंद्र सरकारने देशातील ७३३ जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी केली आहे. त्यात कोरोना रूग्णांची जास्त संख्या आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये (हॉटस्पॉट), कोरोना रूग्णांची मर्यादित संख्या असलेल्या जिल्ह्यांचा ऑरेंज झोनमध्ये आणि एकही रूग्ण नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे. जास्त रूग्ण संख्या आढळून आल्यामुळे सील करण्यात आलेल्या रेड आणि ऑरेंज झोनमधील भागांचा समावेश कंटेनमेंट झोनमध्ये करण्यात आला आहे.

मद्यविक्रीतून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्यामुळे ही दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे लावून धरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन-१ घोषित केल्यानंतर २४ मार्चपासून मद्यविक्रीची दुकाने आणि पानटपऱ्या बंद आहेत.

मद्यविक्रीची दुकाने उघडताना किमान सहा फुटांचे सोशल डिस्टन्सिंग आणि एकावेळी दुकानात फक्त पाचच व्यक्तींना परवानगी या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. सोमवारपासून याच निकषांचे कठोरपणे पालन करण्याच्या अटींवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील मद्यविक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील मद्यविक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेतील मार्गदर्शक सूचना अधिक कडक करण्याची राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मुभा आहे. मात्र त्या सौम्य करण्याची मुभा असणार नाही. म्हणजेच केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन वगळता रेड ( फक्त स्टँड अलोन/ एकाकी), ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश घेऊ शकतात. मात्र रेड झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करण्याची परवानगी राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेश देऊ शकत नाहीत.

कंटेनमेंट झोनचे क्षेत्र नेमके किती?- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हा प्रशासनाला कंटेमेंट झोन, रेड झोन आणि ऑरेंज झोन जाहीर करण्याचे अधिकार आहेत. कंटेनमेंट झोनची हद्द निश्चित करताना कोरोना संसर्गित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या हालचालींचे भौगोलिक क्षेत्र, सीमांकनयोग्य परिघ क्षेत्र या बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. शहरी भागामध्ये कंटेनमेंट झोनची बाह्य सीमा ही निवासी वसाहत, मोहल्ला, महानगरपालिकेचा प्रभाग, पोलिस ठाण्याची हद्द किंवा शहर अशी राहील. तर ग्रामीण भागात गाव, गावांचा समूह, ग्रामपंचायत, पोलिस ठाण्यांचा समूह, गट आदीनुसार राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा