दारूची दुकाने सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास उघडी ठेवता येतीलः आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
1744
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला तर दारूची दुकाने उघडी राहू शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या विधानामुळे गेल्या सहा आठवड्यांपासून बंद असलेली दारू दुकाने लवकरच खुली होण्याची शक्यता बळावली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात येऊ नये, असे टोपे यांनी फेसबुक लाइव्ह दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मनीकंट्रोलने हे वृत्त दिले आहे.

फेसबुक लाइव्हमध्ये दारू दुकानांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दारूची दुकाने नेमकी केव्हापासून उघडतील, हे राजेश टोपे यांनी थेट सांगितले नाही. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे पाळला तर दारुची दुकाने बंद ठेवण्याची गरज नाही, असे टोपे म्हणाले. टोपे यांच्या या विधानामुळे गेल्या सहा आठवड्यांपासून घशाला कोरड पडल्याने तगमगलेल्या तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजेश टोपे यांनी या फेसबुक लाइव्हमध्ये कोरोनाची स्थिती आणि उपाययोजनांबाबतही माहिती दिली.

हेही वाचाः महाराष्ट्रात कोरोनाच्या ७५ हजार रॅपिड टेस्ट करणारः आरोग्य मंत्री राजेश टोपे

 आरोग्यमंत्र्यांनीच दारूची दुकाने उघडण्याबाबतचे संकेत दिल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे कठोर पालन करण्याच्या अटीवर ही दुकाने  उघडी ठेवण्याबाबत लवकरच आदेश जारी होण्याची शक्यता आहे. लिकर इंडस्ट्री हा राज्याच्या महसुलाचा एक महत्वाचा महसूल देणारा घटक आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १६,६६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

गेल्या सहा आठवड्यांपासून घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याचे अर्थचक्रच रूतून बसले असून राज्याचा गाडा हाकण्यासाठी आता सरकारला महसुलाची गरज आहे. लॉकाडाऊनमुळे राज्याचे उत्पन्न सध्या शून्यावर आलेले असल्यामुळे थेट महसुलाचे स्रोत तातडीने सुरू करण्यावर सरकारला भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मद्य विक्रीची दुकाने लवकरच उघडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा