नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. स्वतःही काही निष्काळजीपणा करू नका आणि दुसऱ्यालाही करू देऊ नका, असे आवाहन मोदी यांनी केले.
याआधी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज संपत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या लॉकडाऊनची मुदत आणखी वाढवली. आपण हिम्मत ठेवली, नियमांचे पालन केले तरच आपण कोरोनासारख्या महामारीला पराभूत करू शकू, असेही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी देशवासियांना आठ गोष्टींचे पालन करण्याचा आग्रह धरला. त्या अशा-
१.आपल्या घरातील वयोवृद्धांवर विशेष लक्ष
ठेवा. ज्यांना जुना आजार आहे, त्यांची आम्हाला जास्त काळजी घ्यायची आहे. त्यांना
कोरोनापासून वाचवायचे आहे.
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेचे पूर्णतः पालन करा. घरामध्येच
तयार केलेले फेसकव्हर किंवा मास्कचा अनिवार्य वापर करा.
३. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे
पालन करा. गरम पाणी, काढा यांचा नित्यनेमाने वापर करा.
४. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करण्यासाठी आरोग्य सेतु हा ऍप आवश्य डाऊनलोड
करा. दुसऱ्यांनाही हा ऍप डाऊनलोड करायला प्रवृत्त करा.
५. जेवढे शक्य असेल तेवढी गरिबांची देखभाल करा. त्यांच्या भोजनाची गरज भागवा.
६. तुम्ही तुमचा व्यवसाय, उद्योगात तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांबाबत
संवेदनशीलता दाखवा, कोणालाही नोकरीवरून काढून टाकू नका.
७. देशातील कोरोनो योद्धे, आमचे डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, पोलिस यांचा पूर्ण
आदर राखा, त्यांचा सन्मान करा.
८. पूर्ण निष्ठेने ३ मेपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा. जेथे आहात तेथेच
रहा, सुरक्षित रहा. वयं राष्ट्रे जागृयाम… आम्हाला सर्वांना राष्ट्राला जीवंत
आणि जागृत ठेवायचे आहे.