लॉकडाऊन आणखी एक महिना वाढणार?, मोदींकडे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा आग्रह

0
2429

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार की आणखी वाढणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना केली. लॉकडाऊनमध्ये एकाएकी शिथिलता देता येणार नाही, याबाबतही या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहमती झाली. त्यामुळे आणखी किमान महिनाभर तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमध्ये लॉकडाऊन अधिक कडक राहील, यलो झोनमध्ये काही सवलती दिल्या जातील तर ग्रीन झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणयाच्या अटीवर लॉकडाऊन पूर्णतः उठवला जाण्याची शक्यता आहे.

३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, अशी सूचना मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आज चौथी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होती. परंतु वेळ नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे केवळ नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलण्याची संधी मिळाली.

हेही वाचाः ३ मेपासून देशातील कोरोना रूग्ण संख्येचा वेग प्रचंड वाढणार, दररोज किमान दीडहजार नवे रुग्ण…

भारतावरचे कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा.  दो गज दूरी हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे, असे मोदी म्हणाले.

हेही वाचाः कोरोना महामारीच्या संकटाने केली मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ची पोलखोल!

संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही, याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा. पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादींबाबत निर्णय घ्यावे लागतील. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मूल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचाः कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५० वर्षे होणार?, सरकार म्हणते तसा विचार नाही

सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल प्रुफ करा. ज्या क्षेत्रांत कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तेथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार आहे. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले.

हेही वाचाः रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा!

लॉकडाऊन वाढवण्याची १० राज्यांची मागणीः मोदींच्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये जवळपास १० राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. या राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रूग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणसारखी राज्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मेनंतरही लॉकडाऊनमधून अचानक ढील दिली जाणार नाही. मात्र लॉकडाऊनचे स्वरूप अधिक स्थानिक केले जाण्याची शक्यता आहे. रेड झोनमध्ये संपूर्ण कठोर नियमांसह लॉकडाऊन लागू राहील. यलो झोनमध्ये काही सवलती दिल्या जातील आणि ग्रीन झोनमधून सोशल डिस्टन्सिंग कायम राखण्याच्या अटीवर लॉकडाऊन पूर्णतः मागे घेतला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा