कोरोना फैलावू नये म्हणून लग्नासाठी दोनशेचीच मर्यादा, मग राजकीय प्रचारसभांना रानमोकळे कसे?

0
243
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबादेतील २३ नोव्हेंबरच्या सभेचे छायाचित्र.

कौशल दीपांकर/ मुंबई
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा धुराळा सुरु आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या बैठका आणि प्रचारसभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमावली सर्रास पायदळी तुडवली जात आहे. लग्न समारंभासाठी केवळ दोनशेच व्यक्तींची मर्यादा आणि कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे निर्बंध असताना या राजकीय प्रचारसभांना कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यास रानमोकळे कसे? राजकीय प्रचासभांतील गर्दीला कोरोना घाबरतो का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर पदवीधर आणि पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात सध्या निवडणूक होत असून या पाच जागांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पाचही मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या जोरदार प्रचारसभा रंगू लागल्या आहेत. या प्रचारसभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमावली पायदळी तुडवली जात आहे. एका एका प्रचारसभेत किमान पाचशेच्या वरच गर्दी होत आहे. या गर्दीतील ९० टक्क्यांहून अधिक लोक साधा मास्कही वापरत नाहीत.

कोरोना नियमावलीनुसार लग्न समारंभासाठी फक्त दोनशेच व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यातही कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे निर्बंध घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता तर लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीमुळे जर कोरोना विषाणूचा फैलाव होत असेल तर दोनशेपेक्षाही जास्त नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी असलेल्या निवडणूक प्रचारसभांमधून कोरोना विषाणूचा फैलाव होत नाही का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बातमीसोबत प्रकाशित करण्यात आलेले छायाचित्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबादेतील सभेचे आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारानिमित्त बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी दोनशेपेक्षा अधिक आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडवण्यात तर आलेला आहेच, शिवाय गर्दीतील ८० ते ९० टक्के कार्यकर्त्यांनी साधा मास्कही घातलेला नाही. अशीच परिस्थिती या पाच मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आणि बैठकांची आहे. मग अशा गर्दीतून कोरोना संसर्ग फैलावत नाही का? की राजकीय पक्षांच्या गर्दीला कोरोना घाबरतो ?  या गर्दीत कोरोना नियमावलीचे पालन होते की नाही हे पहाण्याची जबाबदारी कुणाची? राजकीय पक्षाच्या सभा आहेत म्हणून सर्वच नोडल अधिकारी त्याकडे डोळेझाक करत आहेत का?, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा