गैरसमज पसरवू नका, भावनांशी खेळण्याचे राजकारण खपवून घेणार नाहीः मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
88
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोणीही राजकारण करून कोणीही गैरसमज पसरवू नये.  भावनांशी खेळण्याचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिला आहे. कोरोनाचा मुकाबला करताना केंद्र आणि राज्य सरकार सहकार्याने काम करत आहे. विविध पक्षांचे नेतेही सोबत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियावरील लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला. वांद्रे रेल्वे स्टेशनवर परराज्यातील मजूर कामगारांनी दुपारी प्रचंड गर्दी केली होती. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, रेल्वे सुरु होणार अशा अफवेने लोक जमले. मात्र अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. तुम्ही आपल्या राज्यात नसलात तरी आपल्याच देशात आहात आणि तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी भावनांशी खेळण्याचे राजकारण केले तर सहन केले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले तसेच लाखो भीम सैनिक आणि नागरिकांनीही घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली असे सांगत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही ते म्हणाले.

आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनिवारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उद्योग सुरू करण्याचा निर्णय २० एप्रिलनंतरः कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय २० एप्रिलनंतर घेण्यात येईल. शेतकऱ्यांचा  खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे, बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील अर्धा एप्रिल संपला आहे. दीडमहिन्यांनी पाऊस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत मग त्यात गडचिरोली, अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा