सोमवारपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी, राज्य सरकारचे आदेश जारी

0
678
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधातून सूट देण्यास राज्य सरकारने सुरूवात केली असून सोमवार ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात मार्गदर्शक सूचनांमध्ये दुरूस्तीची करणारा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंधात शिथिलता आणण्यास प्रारंभ केला आहे.  मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. आज जारी केलेल्या आदेशानुसार रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी पूर्णवेळ आणि दुसऱ्या बाजूची दुकाने पूर्णवेळ दुसऱ्या दिवशी उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थापन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही दुकाने सुरू होतील, यासाठी मार्केट/ शॉप ओनर्स असोसिएशनचा सक्रीय सहभाग महानगर पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे.

खासगी कार्यालयेः मिशन बिगिन अगेनच्या तिसऱ्या टप्प्यातील तरतुदीनुसार सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचाऱ्यांसह ( जी संख्या जास्त असेल ती) कामकाज सुरू करतील. सर्व नियोक्त्यांनी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशनबाबतचे प्रशिक्षण देऊन जागृती करावी, त्यामुळे हे कर्मचारी घरी परतल्यानंतर वयोवृद्ध लोकांना संसर्ग होणार नाही. ७ जूनपासून वृत्तपत्रांची छपाई आणि वितरणास ७ जूनपासूनच परवानगी देण्यात आली आहे. हे करत असताना वृत्तपत्र विक्रेत्यांनी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर वापरावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थांची कार्यालयेः शैक्षणिक संस्थांची कार्यालये (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) फक्त इ-कंटेन्टची निर्मिती, उत्तर पत्रिकांची तपासणी आणि निकाल घोषित करणे यासारख्या बिगर अध्यापनाच्या कामकाजासाठीच सुरू राहतील.

 व्यक्तींच्या आंतरजिल्हा आणि आंतरराज्य येण्याजाण्यासाठी ई-पास बंधनकारक राहणार आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेशातील महानगर पालिका क्षेत्रात व्यक्तींच्या ये-जा करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील, असे राज्य सरकारने आज जारी केलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे.

व्यायामाची उपकरणेः मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात मोकळ्या मैदानात व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी  स्विंग्स, बार्ससारखी व्यायामाची उपकरणे, गार्डन, खुल्या जीममधील उपकरणे वापरण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा