या स्वचाचणी टूलद्वारे ओळखा तुमच्यातील कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे

0
198

मुंबई :  कोरोना विषाणुचा संसर्ग वेगाने पसरत चाललेला आहे. दररोजच कानावर पडणाऱ्या कोरोनाच्या बातम्या आणि वाढत चाललेली बाधितांची संख्या यामुळे काहीसे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असले तरी अनेक जण अद्यापही म्हणावे तितके जागरूक झालेले दिसत नाहीत. लपवणे किंवा अंगावर काढण्याची आपली प्रवृत्तीच कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याला कारणीभूत ठरू शकते. म्हणून महाराष्ट्र सरकारने सेल्फ असेसमेंट टूल ( स्व-चाचणी) तयार केले असून या टूलद्वारे प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे स्वतःच ओळखण्यासाठी मदत होते.  हे टूल https://covid-19.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे.

हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड -१९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या प्लॅटफॉर्म्सचा मुख्य हेतू आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्र व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे विलगीकरण करणे आणि तीव्र लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पण बऱ्याच नागरिकांमध्ये काही किरकोळ (निम्न) लक्षणे जसे की सर्दी, ताप, खोकला, ज्यांचा कोरोना विषाणू संसर्गाशी संबंध नसू शकतो. अशा वेळेस नागरिक घाबरून न जाता योग्य ती कार्यवाही करू शकतात. अशा बाबतीमध्ये प्राथमिक पातळीवर आपल्या घरीच स्व-चाचणी करता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार व अपोलो २४x७ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेल्फ असेसमेंट टूल बनवण्यात आले.

विशेष बाब म्हणजे या प्लॅटफॉर्ममुळे प्रशासनाला चाचणी घेतलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो. तसेच इतर स्व-चाचणी टूल फक्त परिणाम दर्शवितात. मात्र या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये करोनासदृश लक्षणे ही मध्यम किंवा उच्च स्वरूपाची असल्यास अशा व्यक्तीचे‌ वैयक्तिक तपशील प्रशासनापर्यंत पोहोचवले जातात. यामुळे प्रशासनाला सक्रिय पद्धतीने संभाव्य संक्रमण अधिक प्रभावीपणे शोधण्याची मदत होईल. हे सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल प्रत्येकाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर कोविड 19 रोखण्यासाठी ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ (Do’s & Dont’s), हेल्पलाइन क्रमांक आणि संबंधित माहितीही उपलब्ध आहे. डॉक्टरांकडून दूरध्वनी, व्हिडीओ कॉलद्वारे आरोग्यसेवेचा सल्ला घेण्यासाठीची सुविधाही लवकरच उपलब्ध होईल.

हा प्लॅटफॉर्म क्यूआर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खाजगी दवाखाने येथेही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येईल. या नोंदी केल्याने प्रशासनाला सतत अद्ययावत होणारा डॅशबोर्ड पाहता येईल आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेता येतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा