नवरात्रोत्सवासाठीही राज्य सरकार जारी करणार नियमावली, गणेशोत्सवासारखेच साधेपणाचे निर्बंध!

0
10

मुंबईः येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. एरवी धुमधडाक्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवावर यंदा कोरोनामुळे निर्बंध येणार असून गणेशोत्सवामध्ये जारी केली होती, त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवासाठीही नियमावली जारी केली जाणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गणपती उत्सव साजरा करण्याबाबत सरकारने परिपत्रक काढून गणेश मंडळांसाठी काही नियमावली घालून दिली होती. राज्यातील गणेश मंडळांनी त्या नियमावलीचे पालन करत हा उत्सव साजरा केला. त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सवासाठीही नियमावलीचे परिपत्रक लवकरच जारी केले जाणार आहे.

 सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गणपती उत्सवादरम्यान सहकार्य केले त्याचप्रकारे या सणामध्येही सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सूचनांचे पालन करा, कोरोना टाळाः लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील सरकारने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी. जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा