महाराष्ट्रात वर्षभर विकास कामांना कात्री; नोकर भरती, बदल्यांवरही बंद

0
421

मुंबईः  कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राने पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत विकास कामांवरील खर्चात ६७ टक्के कपात केली आहे.  कोरोनाच्या महामारीच्या मुकाबल्यात सातत्य रहावे म्हणून वर्षभर सर्व खात्यातील बदल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत राज्यातील नोकर भरतीवरही बंदी घालण्यात आली आहे.

देशात आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी तब्बल ३० टक्के रूग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या कर महसुलाचे आतापर्यंत ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याला विविध करांतून चालू आर्थिक वर्षात २, २५, ०७१ कोटी रुपये महसूल अपेक्षित होता. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे हा महसुली तोटा वाढतच जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकास कामांवरील खर्चात ६७ टक्के कपातीबरोबरच वर्षभर बदल्या-नोकर भरतीवर बंदी आणली असून नवीन विकास कामांना मंजुरी आणि नव्या खरेदीसाठीच्या निविदांवरही स्थगिती आणली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

सध्या सुरू असलेल्या विकास योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश सर्व खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत. जी कामे टाळता येण्यासारखी नाहीत, अशीच कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. उर्वरित कामांना स्थगिती दिली जाईल. जी कामे टाळता येण्यासारखी आहेत, ती रद्द केली जातील, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. तोट्यात चालणाऱ्या मंडळांना सध्या निधी देऊ नये, असे निर्देशही सर्व खात्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे राज्याचे महसुली उत्पन्न घटल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे ५० हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या या मागणीला अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. उलट महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा पूर्ण हिस्साही अजून केंद्र सरकारने दिलेला नाही.

या घडीला महाराष्ट्रात १४,५१ कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यापैकी ५८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांचे प्रमाण देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांच्या तुलनेत ३० टक्के तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा