मध्यमवर्गीयांना किमा आधारभूत किमतीत धान्य द्याः मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

0
42
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेत केवळ तांदूळ मिळत आहे, त्याचे वाटप ही आपण सुरु केले आहे, परंतू त्याचा केशरी कार्डधारकांना लाभ होत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र आपण पाठवले असून किमान आधारभूत किंमतीवर मध्यमवर्गीयांना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे. भार सर्वांवरच आहे. राज्य सरकारने कालच मंत्रिमंळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला आहे. आता केंद्रानेही यात मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोशल मिडीयावरील लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिवभोजन केंद्राची व्याप्ती वाढवतांना योजनेची क्षमता एक लाखापर्यंत वाढवल्याचे व यात आणखी वाढ करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वत:चा मास्क इतरांना देऊ नकाः मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री अंतर राखून बसले होते, प्रत्येकाने चेहऱ्याला मास्क लावले होते. हे सोशल डिस्टंसिंग आम्ही पाळतो, तुम्हीही पाळा. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर जातांना गर्दी करू नका तसेच घरगुती स्वरूपात तयार केलेले मास्क लावूनच बाहेर जा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, एकाचा मास्क दुसऱ्यांनी वापरु नये. वापरलेला साधा कपड्याचा मास्क गरम पाण्यात धुवून कडक वाळवून पुन्हा वापरावा. जे रेडिमेड मास्क वापरतील त्यांनी त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक लावावी.  सुरक्षित जागा पाहून हे मास्क जाळावेत व त्याची राख सुरक्षितपणेच फेकावी, म्हणजे विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

तंदुरुस्ती हवीः कोरोनाच्या संकटानंतर एक नवीन आर्थिक संकट उभे राहणार आहे, या संकटाशी सामना करण्यासाठी, या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तंदुरुस्तीची आणि हिंमतीची आवश्यकता आपल्या सगळ्यांना पडणार आहे. त्यामुळे घरातच हलके फुलके व्यायाम करा, ज्यांना शक्य आहे आणि जमते त्यांनी योगा करा, घरातील वातावरण आनंदी ठेवा. हायरिस्कच्या नागरिकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावे अशा सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिन्यांनीही घरातील वातावरण तणावमुक्त ठेवण्यासाठी बातम्यांप्रमाणेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावेत, जुने कार्यक्रम दाखवावेत असे आवाहन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा