राज्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्गांसह आणखी ‘या’ गोष्टींवर महिनाभर बंदी

0
157

मुंबईः मिशन बिगिन अगेन म्हणजेच पुनश्चः प्रारंभ अभियानांतर्गत राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यात केली जाईल. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह  ऑटोरीक्षा, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील. हा आदेश १ जूनपासून 30 जूनपर्यंत लागू राहील. मात्र या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने पाचवा लॉकडाऊन जाहीर करताना बऱ्याचशा गोष्टींना टप्प्याटप्प्याने निर्बंधातून सूट देण्याचे ठरवले असले तरी सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठे समारंभ, केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर, सार्वजनिक धार्मिक स्थाने / पूजास्थळे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.

या काळात प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून, मेट्रो रेल्वे सेवा, स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी राहणार आहे. निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया तसेच यातील काही बाबींना सुरू सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाईल, असे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदीः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्रीय मार्गदर्शिकेचे पालन या कालावधीत केले जाईल. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत बंदीचे आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करतील. ६५ वर्षावरील व्यक्ती, कोमॉ बिडिज असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि मुलांनी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा