पिणाऱ्यांसाठी नव्हे तर महसुलासाठी वॉइन शॉप्स सुरू करायला काय हरकत आहे?: राज ठाकरे

1
850
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गेल्या ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत पार खडखडाट झाला आहे. त्यामुळे तिजोरीत काही प्रमाणात आवक सुरू व्हावीच लागेल. अजून किती दिवस टाळेबंदी राहील याची खात्री नसल्यानुळे अशा काळात किमान वाइन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल, हे बघायला काय हरकत आहे, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. त्यात ही एक सूचना आहे. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे. आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. ‘वाईन शॉप्स’ सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. आज पोलिसांपासून ते आरोग्य सेवक, नर्सेस ह्या अनेकांकडे पीपीई किट्स नाहीत, लोकांना मोफत जेवण किंवा इतर काही पुरवायचे म्हटले तर ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात करत राज्य सरकार दिवस ढकलते आहे. कारण त्यांची तिजोरी पण साफ झाली आहे. अगदी सरकारी कर्मचारी वर्गाला पगार द्यायलाही पैसे नाहीत ही परिस्थिती आहे. त्यामुळे ‘वाईन शॉप्स’तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज आहे, असे राज यांनी म्हटले आहे.

आधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असे कोणी म्हणत नाहीय. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकाने सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. मराठीत म्हण आहे ना ‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ तसे आता राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्विकारले पाहिजे. बाकी जे या दुकानांमध्ये जातील त्यांना शारीरिक अंतर राखून खरेदी करायला लावणे इत्यादी गोष्टींसाठी कडक निकष लावता येतीलच, असे राज यांनी या पत्रात नमूद केले आहे.

आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल.  भाजीपाला, फळफळावळ, दूध, बेकरी आणि किराणा अशा गोष्टीदेखील एक-एक करून सुरू कराव्यात. काही ठिकाणी आहेत परंतु त्यात सुसूत्रता नाही. अशाच गोष्टी हळूहळू सुरू करत राज्याचे अर्थचक्र सुरू करून द्यायला पाहिजे. ह्या रोगाचा सामना करण्यासाठी लोक सहकार्य करतीलच परंतु आपल्यालाही त्यांचे जगणे सुसह्य व्हावं ह्याचा विचार करायला हवा आहे, असे राज यांनी म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा