मोदी सरकारकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यातीबंदी अंशतः मागे, दबावात निर्णयाचा इन्कार

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यातबंदी कोणाच्याही दबावाखाली मागे घेतल्याच्या आरोपाचा परराष्ट्र मंत्रालयाने इन्कार केला आहे. हे औषध द्या अन्यथा गंभीर परिणाम भोगा, असा इशारा अमेरिकेने भारताला दिला होता.

0
352
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणुच्या संसर्गावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, असा गर्भित इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर काही तासांतच मोदी सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध अंशतः मागे घेतले आहेत. मात्र हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेण्यात आल्याच्या वृत्ताचा परराष्ट्र मंत्रालयाने इन्कार केला आहे

कोविड-१९ शी संबंधित औषधे आणि फार्मास्युटिकल्सच्या मुद्यावर अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही पहातो आहोत. कोणत्याही जबाबदार सरकारप्रमाणे आपल्या लोकांच्या आवश्यकतेनुसार औषधांचा पुरेसा साठा असावा हे पाहणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यासाठीच काही औषधांच्या निर्यातीवर बंदी घालण्याबाबत काही हंगामी स्वरुपाची पावले उचलण्यात आली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. . भारताने पॅरासिटामोलच्या निर्यातीवरील बंदीही मागे घेतली आहे.

सर्व प्रकारची आकस्मिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही पुरेशा प्रमाणात हे औषध उपलब्ध होऊ शकते, याची खात्री झाल्यानंतरच निर्यातबंदी बऱ्याच प्रमाणात हटवण्यात आली आहे, असे श्रीवास्तव म्हणाले. हा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेतल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) आणि पॅरासिटामोल ही औषधे एका लायसेन्स श्रेणीत ठेवली जातील. या औषधांच्या मागणीच्या परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जाईल. पुरेशा प्रमाणातील साठ्याची स्थिती आमच्या कंपन्यांची निर्यातीबाबतची वचनबद्धता पूर्ण करण्यास अनुमती देऊ शकते, असेही ते म्हणाले.

कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाने भक्कम एकजूटता आणि सहकार्य दाखवले पाहिजे, याचा आग्रह भारताने नेहमीच धरला आहे. कोरोना महामारीचे मानवी पैलू लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीने अत्यंत प्रभावित झालेल्या काही देशांना आम्ही या औषधांचा पुरवठा करू, असेही श्रीवास्तव म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा