जनता उपाशी अन् मोदी सरकार तयार करणार अतिरिक्त तांदळापासून सॅनिटायझर निर्मिती!

0
73
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः  देशावर ओढवलेले कोरोना विषाणूचे संकट आणि त्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लक्षावधी लोकांवर आलेली उपासमारीची वेळ अशा स्थितीत केंद्र सरकारने भारतीय खाद्य निगमच्या गोदामातील बफर स्टॉकमध्ये असलेल्या तांदळापासून सॅनिटायझर निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या तांदळापासून सॅनिटायझर निर्मितीसाठी आवश्यक असलेले इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोदी सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८ चा हवाला देऊन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. या धोरणानुसार अतिरिक्त अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे ( एफसीआय) उपलब्ध असलेल्या तांदळापासून इथेनॉल निर्मिती करण्यास आणि त्याचा उपयोग अल्कोहोल आधारित सॅनिटायझरची निर्मिती आणि पेट्रोलमध्ये मिसळण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात भरमसाठ अन्नधान्य पडून असूनही कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लक्षावधी गरिबांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या मुद्यांवरून गेल्या काही आठवड्यांपासून वाद सुरू असतानाच मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोदी सरकारने गरिबांना अतिक्त अन्नधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेले ५ किलो तांदूळ केवळ ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे, अशाच लोकांसाठी आहेत. बहुतांश स्थलांतरित मजुरांकडे कामाच्या ठिकाणी रेशनकार्डच नाही. देशात अशा लोकांची संख्या ५० लाखांच्यावर असल्याचा अंदाज आहे.

गरीब केव्हा जागा होणार? – दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. तुम्ही उपाशी मरत आहात आणि ते तुमच्या वाट्याच्या तांदळापासून सॅनिटायझरची निर्मिती करून श्रीमंतांचे हात स्वच्छ करण्याचे काम करत आहेत, असे सांगत भारतातील गरिब अखेर केव्हा जागे होणार?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

आधी गरिबांचे पोट भरण्यास प्राधान्य द्याः  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरिब एकीकडे अन्नासाठी संघर्, करत असताना केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायझर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटायझर आवश्यक आहे. त्याचे उत्पादन करायला हवे. परंतु या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरिबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरित मजुरांसाठी देऊ शकतो. पंतप्रधानांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून तो तांदूळ गरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध करावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा