मुंबईः महानगरी मुंबईत पाच कोरोना बाधित रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. विनाकारण लोकांनी गर्दी करू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. येत्या ३१ मार्चपर्यंत हे जमावबंदी आदेश लागू राहतील.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२ वर गेली आहे. आज औरंगाबादेतही एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आल्यामुळे आता पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊन गर्दी करता येणार नाही. या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही मुंबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी मोठे समारंभ, अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ खबरदारीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. येत्या ३१ मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदी आदेश लागू राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून जनजागृतीही करण्यात येत आहे.