खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना कोरोनाची बाधा, नांदेड सोडून औरंगाबादेत घेत आहेत उपचार

0
278
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद/नांदेडः नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा होणारे खासदार चिखलीकर हे नांदेड जिल्ह्यातील पाचवे लोकप्रतिनिधी आहेत.

चिखलीकर यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर खासदार चिखलीकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत. प्रवीण पाटील यांच्यावरही औरंगाबादमध्येच उपचार सुरू आहेत.

 यापूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे, अमर राजूकर, हदगाव-हिमायनगरचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती.  जळगावकर यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. उर्वरित लोकप्रतिनिधी कोरोनामुक्त झाले आहेत.

चिखलीकरांचा नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का?: सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नांदेड येथील खासगी रूग्णालयातून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. त्यावेळी अशोक चव्हाण यांचा नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही काय?, असा सवाल करत खासदार चिखलीकरांनी चव्हाणांवर टिकेची झोड उठवली होती. नांदेडच्या आरोग्य सेवेत उपचार न घेता पालकमंत्री मुंबईला उपचार घेण्यासाठी जाणे हे नांदेडच्या आरोग्य विभागावर, त्यांच्या कामावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करणारी ही बाब आहे, असेही चिखलीकर म्हणाले होते. आता स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये उपचार न घेता औरंगाबादेत उपचार सुरू केल्यामुळे चिखलीकरांचीही नांदेडच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का? असा सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा