कॅप्टन एकाच ठिकाणी हवा म्हणून मुख्यमंत्री मुंबईतः पवारांनी सांगितले ठाकरेंच्या न फिरण्याचे कारण!

0
695
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः राज्यातील प्रत्येक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग फोफावला आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी कुठे कुठे बसावे? त्यामुळे ते एकाच ठिकाणी बसून राज्याच्या कानाकोपऱ्यातून माहिती घेत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री कॅप्टनच्या भूमिकेत आहेत आणि कॅप्टनने एकाच ठिकाणी बसून गाडा हाकायचा असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

औरंगाबादेतील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार हे आज शनिवारी औरंगाबादेत आले होते. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह  रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, आ. अंबादासराव दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.

लातूरला भूकंप झाला तेव्हा तुम्ही लातुरात मुख्यमंत्री कार्यालय हलवले होते. मात्र सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच ठिकाणी बसून काम करत असल्याचा आरोप होत आहे, असा प्रश्न पवारांनी पत्रकारांनी विचारला. त्यावर पवार म्हणाले, लातूरचा भूकंप हा एका मर्यादित क्षेत्रापुरता होता. मात्र कोरोना हा राज्यात प्रत्येक ठिकाणी फोफावला आहे. अशावेळी मुख्यमंत्री यांनी कुठे-कुठे बसावे? यासाठी ते एकाच ठिकाणी बसून राज्याच्या कानाकोपर्‍याची माहिती घेत त्यावर मार्गदर्शन करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. कॅप्टनने एकाच ठिकाणी बसून गाडा हाकायचा असतो. मुख्यमंत्री ते यशस्वीपणे करत आहेत, असे पवार म्हणाले.

खासगी डॉक्टरांनाही समन्स बजावून सेवा देण्याचे आदेश द्याः राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि औरंगाबाद या शहरात कोरोना स्थिती चिंताजनक आहे. या स्थितीत प्रशासन योग्यरित्या काम करीत आहे. मात्र, यात आता खासगी रुग्णालयेच नाही तर त्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी लागणार आहे. आपत्ती काळात मदत करणे, ही प्रत्येक खासगी यंत्रणेचीही जबाबादारी आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रूग्णालयांसह तज्ज्ञ डॉक्टरांना समन्स बजावून सेवा देण्याचे आदेश देण्याची सूचना पवार यांनी औरंगाबादेत जिल्हाधिकाऱ्यांना केली.

राज्यातील आठ जिल्ह्यांतील परिस्थिती चिंता करण्यासारखीः देशात कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, दिल्ली, तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कल्याण, डोंबविली, ठाणे, नाशिक आणि औरंगाबादेत अधिका काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे येथील आढावा घेण्यासाठी मला यावे लागले. राज्यात रुग्ण वाढ रोखण्यासोबतच कोरोनामुळे होणारे मृत्युदर कमी करण्यावर जास्त भर दिला जात आहे. औरंगाबादेत काय आवश्यक आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती सादर करणार असल्याचे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा