ज्ञानाचा दिवा लावा, अंधश्रद्धेच्या मार्गाने जाऊ नकाः मोदींच्या ‘दिवे लावणी’वर शरद पवारांचे शरसंधान

0
1116

मुंबईः अंधश्रद्धा माणसाला दैववादी बनवते. ती माणसातील चिकित्सा थांबवते. काहीही झाले तरी अंधश्रद्धेच्या मार्गाने जाणे योग्य नाही. काहीही झाले तरी एकमेकांत कटुता वाढेल, संशय वाढेल असे होता काम नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिवे लावणी’वर शरसंधान केले. महात्मा फुलेंनी ज्ञानाचा संदेश दिला. एकतेचा संदेश दिला. त्यामुळे ११ एप्रिलला महात्मा फुल्यांचा जयंती ज्ञानाचा दिवा लावून आणि एक दिवा संविधानासाठी लावून १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. पवार म्हणाले, जी काही माहिती मिळते, त्यावरून जगातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४०६७ आहे. त्यापैकी ३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. या सगळ्या स्थितीत सर्व धर्म, जात, भाषा यांनी एकत्र राहण्याची गरज आहे. कटुता वाढेल, संशय वाढेल असे होता कामा नये. मी जे काही टीव्हीवर बघतो, विशेषतः व्हॉट्सअपवर जे मेसेज येत आहेत, ते काळजी करण्यासारखे आहेत. पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. ते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. काही वास्तव पुढे आले तरी त्यासंबंधीची पुनर्मांडणी करून ते कसे खोटे आहे हे सांगणारे मेसेज येतात.

दिल्लीच्या निझामुद्दीन मरकझमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनावरही पवारांनी भाष्य केले. अशा स्थितीत हे संमेलनच व्हायला नको होते. त्याला परवानगीच द्यायला नको होती. महाराष्ट्रात अशा संमेलनासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु गृह मंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवून परवानगी नाकारली. ती खबरदारी दिल्लीत घेतली गेली असती तर आज टीव्हीवरून वारंवार एखाद्या वर्गाला लक्ष्य करून सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे, ती संधी मिळाली नसती, असे पवार म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यात बैलघोड्याची शर्यत आयोजित केली होती. पोलिसांनी लगेचच त्यांच्यावर खटले भरण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पोलिसांनी तत्परता दाखवली. तशीच तत्परता दिल्लीत दाखवली गेली असती तर आज जे पुन्हा पुन्हा पहायला मिळते, ते मिळाले नसते. दिल्लीत जे काही घडले ते पुन्हा पुन्हा टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का?  असा सवाल करतानाच याची खबरदारी जाणकार घेतील, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.

आज महावीर जंयती आहे. महावीरांनी सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. त्यामुळे त्यांचे पाईक घरातच महावीर जयंती साजरी करून महावीरांविषयी आदर राखतील, असे सांगतानाच पवार म्हणाले, ११ एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे. म. फुल्यांनी ज्ञानाचा संदेश दिला. एकतेचा संदेश दिला. महात्मा फुल्यांची जयंती ज्ञानाचा दिवा लावून साजरी करू आणि आपण ज्ञानाच्या मार्गाने जाणारे आहोत, असे संदेश देऊ. महात्मा फुल्यांनी कधीच अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही. अंधश्रद्धेच्या मार्गाने जाणे योग्य नाही. अंधश्रद्धा माणसाला दैववादी बनवते. माणसातील चिकित्सा संपवते. काहीही झाले तरी चिकित्सा होत राहिली पाहिजे. त्यामुळे आपण ज्ञानाचे समर्थ करण्याच्या मार्गाने जाऊ. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती आपण महिनाभर साजरी करत असतो. बाबासाहेबांची जयंती आपण एक दिवा संविधानासाठी लावून साजरी करू. गर्दी टाळू. दोन व्यक्तींत अंतर राहील याची काळजी घेऊ आणि कोरोनावर मात करू, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा